पोलीस आपल्या शिवारात अभियान !

By Admin | Updated: July 17, 2017 03:08 IST2017-07-17T03:08:11+5:302017-07-17T03:08:11+5:30

पोलीस अधीक्षकांची संकल्पना: पोलीस गावांमध्ये जाऊन नागरिकांसोबत साधणार संवाद

Police camp in your Shivaraya! | पोलीस आपल्या शिवारात अभियान !

पोलीस आपल्या शिवारात अभियान !

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊन समन्वय राखल्या जावा, यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलीस आपल्या शिवारात अभियान १७ ते २३ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये जाऊन नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, सण, उत्सव आणि गावातील परिस्थितीची माहिती जाणून घेतील.
नुकतेच संपलेले शेतकरी आंदोलन, पावसाची अनियमितता, येणारा पोळा उत्सव या पृष्ठभूमीवर पोलीस आणि ग्रामीण भागातील नागरिक विशेषत: शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आणि समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस आपल्या शिवारात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार हे हद्दीतील गावांना भेटी देऊन तेथील नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्यांसह सण, उत्सव आणि गावातील जातीय परिस्थिती, गतकाळात घडलेल्या घटना याबाबत माहिती जाणून घेतली. नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पोलिसांची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी, ही या अभियानामागील भावना असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्पष्ट केले आहे.
या अभियानाचा प्रारंभ खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांदुर येथून होणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.
यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस आपल्या शिवारात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्त ग्राम समिती, शाळा मुख्याध्यापक, कृषी सहायक, राजकीय नेते यांचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे.

पोलीस मित्र, ग्रामरक्षक सदस्य नोंदणीही करणार!
गावांमधील घटना, घडामोडींची पोलिसांना माहिती व्हावी, गावामध्ये शांतता नांदावी, यासाठी पोलीस दलाच्यावतीने पोलीस मित्र व ग्रामरक्षक सदस्य नोंदणीवर भर देण्यात येत आहे. पोलीस आपल्या शिवारात अभियानादरम्यान अनेक गावांमध्ये जाऊन पोलिसांकडून पोलीस मित्र आणि ग्रामरक्षक सदस्य नोंदणीसुद्धा करण्यात येणार आहे.

Web Title: Police camp in your Shivaraya!