दिवसभर कामाचा पगार फक्त १०० रुपयेच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:48+5:302021-07-30T04:22:48+5:30

अहमदनगर : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ काम दिले जाते. मात्र, या कामाचा पूर्ण मोबदला ...

Why is the daily salary only 100 rupees? | दिवसभर कामाचा पगार फक्त १०० रुपयेच का?

दिवसभर कामाचा पगार फक्त १०० रुपयेच का?

अहमदनगर : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ काम दिले जाते. मात्र, या कामाचा पूर्ण मोबदला दिला जात नाही. मग काम पूर्णवेळ देता तर पगार का दिला जात नाही, असा सवाल करीत महिला परिचरांनी २६ जुलैपासून जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अद्याप त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही, हे विशेष!

जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना धनवटे, सरचिटणीस मंगल उगले, उपाध्यक्षा लता कांबळे, कोषाध्यक्षा मंगल वारे, कुमुदिनी वंजारे, शहनाज शेख, कांता गायकवाड, छाया थोरात, प्रतिभा केसभट, आशाबी शेख, कुंदा देशमुख, योगिता त्रिभुवन, रागिनी गोसावी, लीलाबाई गायकवाड, मंदा भालेराव, मुक्ता वाघ, सुनीता गागरे, रुक्साना शेख, मोहिनी थावरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे, दरवर्षी गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे, नियमित सेवेत कायम करावे, महिला परिचरांना कोविड भत्ता देण्यात यावा, व्यतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, पेन्शन योजना लागू करावी, दरवर्षी गणवेश व भाऊबीज देण्यात यावी, मासिक मानधन दर महिन्याच्या ५ तारखेला प्रदान करावे, प्रवास भत्ता देण्यात यावा, अशा मागण्यांसाठी महिला परिचरांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

कागदोपत्री महिला परिचरांची सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० अशी कामाची वेळ आहे. मात्र, प्रत्यक्षात या परिचर महिलांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून राहावे लागते. कोरोना काळात आरटीपीसीआर चाचण्या करणे, रक्तदाब, शुगरची तपासणी करणे अशी कामे करावी लागतात. याशिवाय नियमित लसीकरण करणे या अतिरिक्त कामाशिवाय आरोग्य केंद्र, उपकेंद्राची स्वच्छता करण्याचे नियमित कामही महिला परिचरांना करावे लागते. वेेगवेगळ्या गावांत लसीकरणासाठी जावे लागते. त्यासाठी प्रवास भत्ताही मिळत नाही आणि या सर्व कामांचा पगारही केवळ १०० रुपये प्रतिदिवस एवढा अत्यल्प दिला जातो. याविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

...............

२९ झेडपी आंदोलन

Web Title: Why is the daily salary only 100 rupees?