नेमकी कारवाई कुणावर करायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:41+5:302021-04-16T04:19:41+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात १ मे पर्यंत ...

नेमकी कारवाई कुणावर करायची?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात १ मे पर्यंत १४४ कलमानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा सुरू आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
संगमनेरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. शहरातील दिल्ली नाका, अकोले नाका, नाशिक-पुणे महामार्ग, अहमदनगरकडे जाणारा रस्ता, नवीन नगर रस्ता आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. असे असूनही शहरात गर्दी होते आहे. पोलीस घराबाहेर पडलेल्यांची चौकशी करत आहेत. नागरिकांकडून अनेक कारणे सांगून पोलीस कारवाई टाळण्याचा प्रयत्न होतो आहे. रुग्णालय, किराणा दुकान, मेडिकल, पेट्रोल पंप व इतर सुरू असलेल्या आस्थापनांमध्ये जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’च्या कडक निर्बंधानुसार पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.
-----------
याची खातरजमा कशी करावी?
घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पोलीस ठिकठिकाणी चौकशी करत होते. काहींनी कोरोनाची तपासणी करण्यासाठी जात असल्याचे तर अनेकांनी महत्त्वपूर्ण कारणाने घराबाहेर पडल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु योग्य कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडले का? याची खातरजमा कशी करावी? असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.
-----------
प्रत्येक नागरिक कुठल्या कामासाठी बाहेर पडला. याची चौकशी करण्यात येते आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे घालून दिलेल्या निर्बंधाचे प्रत्येकाने पालन करावे.
राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग