किराणा, भाजीपाला आणायला चाललोय.. दळण घेऊन निघालोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:47+5:302021-04-16T04:19:47+5:30

शेवगाव : सर मेडिकलमध्ये चाललोय.. भाजीपाला, किराणा आणायला आलोय.. साहेब दळण घेऊन निघालोय.. अशी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या विविध कारणांनी ...

We are going to fetch groceries and vegetables. | किराणा, भाजीपाला आणायला चाललोय.. दळण घेऊन निघालोय..

किराणा, भाजीपाला आणायला चाललोय.. दळण घेऊन निघालोय..

शेवगाव : सर मेडिकलमध्ये चाललोय.. भाजीपाला, किराणा आणायला आलोय.. साहेब दळण घेऊन निघालोय.. अशी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या विविध कारणांनी शेवगाव शहरासह तालुक्यात संचारबंदीची अंमलबजावणीसाठी प्रयत्नरत असलेले पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.

शेवगाव शहरात सकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची तुरळक गर्दी झाली होती. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी ( दि.१४ ) सायंकाळी ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळी भाजीपाला, मेडिकल, किराणा आदी ठिकाणी तुरळक गर्दी दिसून आली. पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना थांबवून विचारणा करण्यात येत होती. त्यामध्ये विशेषतः पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनातील प्रवाशांची पोलीस चौकशी करीत होते. यावेळी नागरिकांकडून अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत होते. तर काही जण लस घेण्यासाठी, काही जण टेस्ट करण्यासाठी व दवाखान्यात चाललो असल्याचे सांगत होते. सरकारच्या निर्देशाचे पालन करीत पोलिसही बाहेर पडलेल्या नागरिकांची सबब ऐकून सोडून देत होते. दुपारच्या सत्रात रस्त्यावर सामसूम होती.

ग्रामीण रूग्णालयात गुरुवारी लसीकरण बंद होते. तर कोरोना आजाराची चाचणी करण्यासाठी दरदिवशी सरासरी १५० नागरिक येतात, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना बाधितांच्या संखेमुळे प्रशासनावरील ताण अधिक वाढला आहे. दरम्यान तहसील, पोलीस, नगरपरिषद, पंचायत समिती कार्यालयात होणारी गर्दी कमी झाल्याने सर्व कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत होता. एरव्ही गर्दी असलेली बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे नागरिकांच्या विना ओस पडली आहेत.

--

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक तर आंबेडकर चौक या तीन ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या ६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी संचारबंदी दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच कोरोना काळातील शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल.

-सुजित ठाकरे,

सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेवगाव

--

१५ शेवगाव

शेवगाव शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद होती. मात्र सकाळी काही नागरिक रस्त्यावर फिरतच होते.

Web Title: We are going to fetch groceries and vegetables.