कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:41+5:302021-08-27T04:24:41+5:30

गतवर्षीपेक्षा चार टक्क्याने कमी पाणीसाठा : उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांना ...

The water supply of the poultry project decreased | कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा घटला

कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा घटला

गतवर्षीपेक्षा चार टक्क्याने कमी पाणीसाठा : उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा यंदा चार टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय झाला आहे.

गेल्या वर्षी १९ हजार ६२७ दशलक्ष घनफूट (६६ टक्के) इतका साठा होता, तर यंदा १८ हजार ४५६ दशलक्ष घनफूट (६२ टक्के) साठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. कुकडी लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पिके जगविण्यासाठी येडगाव धरणातून आवर्तन चालू आहे. त्यामुळे कुकडीतील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. हा उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

येडगाव धरण ओव्हरफ्लो झाले होते. आवर्तन सोडल्याने येडगाव धरणात २७ टक्के म्हणजे ५२५ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक राहिला. कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी माणिकडोह धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येडगाव आवर्तन १ हजार ४०० क्युसेकवरून ५०० क्युसेकवर करण्यात आले आहे. माणिकडोह धरणात ४ हजार ६४५ दशलक्ष घनफूट (४६ टक्के), तर वडज धरणात ७६६ दशलक्ष घनफूट (६५ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

याशिवाय कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणात ११ हजार २८८ दशलक्ष घनफूट (९० टक्केे), तर पिंपळगाव जोगे धरणात १ हजार २३२ दशलक्ष घनफूट (३२ टक्के) इतका पाणीसाठा आहे.

------------

घोड धरण २५ टक्के

घोड नदीवरील घोड धरणात १२०० दशलक्ष घनफूट (२५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. घोडचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोडचाही पाणीसाठा कमी होत आहे.

---------

विसापूरमध्ये पाणी सोडले

विसापूर तलावात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे येडगावमधून ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे विसापूरच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली आहे; पण विसापूरमधून दररोज बेसुमार पाणीउपसा होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. सीना धरणात ५२७ दशलक्ष घनफूट (२७ टक्के), तर जामखेडच्या खैरी तलावात २५ दशलक्ष घनफूट (५ टक्के) पाणी शिल्लक राहिले आहे.

----------ही तर शेतकऱ्यांची हत्या

कुकडी प्रकल्पातील डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याचे सर्व राजकीय पक्षातील नेते निवडणुकीत भांडवल करतात. निवडणूक झाली की पुणेकरांना खूश ठेवण्यासाठी सत्ताधारी गप्प बसतात. विरोधकही आक्रमक होत नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकारने या बोगद्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली होती; पण राज्यात आघाडी सरकार आले आणि बोगद्यात नकारात्मकता सुरू झाली आहे. त्यामुळे आता राजकीय जोडे बाजूला ठेवून तरुणाईने आक्रमक होऊन सत्ताधारी व विरोधी नेत्यांना जाब विचारण्याची गरज आहे, अशी चर्चा तालुक्यात आहे.

Web Title: The water supply of the poultry project decreased