साईभक्त संस्थानच्या दृष्टीने मौल्यवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:53+5:302021-09-07T04:26:53+5:30
शिर्डी : साईभक्त हा संस्थानच्या दृष्टीने मौल्यवान आहे. तो ज्या श्रद्धेने इथे येतो त्या श्रद्धेचा सन्मान ठेवून त्याला सेवा ...

साईभक्त संस्थानच्या दृष्टीने मौल्यवान
शिर्डी : साईभक्त हा संस्थानच्या दृष्टीने मौल्यवान आहे. तो ज्या श्रद्धेने इथे येतो त्या श्रद्धेचा सन्मान ठेवून त्याला सेवा सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी दिली.
कान्हुराज बगाटे यांच्या जागी भाग्यश्री बानाईत यांची गेल्या आठवड्यात नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या नागपूर येथे रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. बानाईत यांनी आज साईसमाधीचे दर्शन घेऊन साईबाबा संस्थानचा पदभार स्वीकारला़. संस्थानच्या विभाग प्रमुखांशी ओळख करून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती.
साईसंस्थानचा लौकिक सर्वत्र व्हावा, भाविकांचे साईदर्शन व शिर्डीतील वास्तव्य आनंददायी व्हावे, आपल्या हातून जास्तीत जास्त चांगले काम व्हावे, प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असेल. शासनाच्या आदेशानंतर मंदिर उघडले जाईल, तेव्हा कोविडचे नियम पाळून भाविकांच्या चांगल्या व सुरक्षित दर्शनासाठी काळजी घेऊ, असे बानाईत यांनी स्पष्ट केले़
.............
शासनाचा आदेश व धार्मिक असलेल्या आईची परमेश्वरावरील श्रद्धा यामुळे साईसंस्थान सारख्या देवस्थानात काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. भक्ताभिमुख काम करणे हे आपले कर्तव्यच आहे.
-भाग्यश्री बानाईत, सीईओ, साईसंस्थान