शेवगावच्या सोळा गावातील ८५४ हेक्टरला अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:19+5:302021-03-25T04:21:19+5:30

शेवगाव : तालुक्यातील १६ गावात ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी ...

Untimely strike on 854 hectares in 16 villages of Shevgaon | शेवगावच्या सोळा गावातील ८५४ हेक्टरला अवकाळीचा तडाखा

शेवगावच्या सोळा गावातील ८५४ हेक्टरला अवकाळीचा तडाखा

शेवगाव : तालुक्यातील १६ गावात ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात देण्यात आली. हा अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले. अद्याप आदेश मिळाले नसल्याने पंचनाम्याला सुरुवात केली नाही, असे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.

ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना गत आठवड्यात शनिवारी (दि.२०) वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या व काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गत काही वर्षात शेतीवर अनेक नैसर्गिक संकटे येऊन गेली. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई, कोरोना व आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे. अवकाळी व गारपिटीने डाळिंब, आंबा, गहू, हरभरा, कांदा आदींसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या अनेक ठिकाणी गहू काढणी सुरू आहे. शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे आणि काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसात भिजलेला गहू पांढरा पडण्याची शक्यता असल्याने त्याला भाव कमी मिळणार आहे. गारपिटीने कांद्याची पात होत्याची नव्हती झाली आहे.

तालुक्यातील आखेगाव तितर्फा, थाटे, वाडगाव, लाडजळगाव, कांबी, गा.जळगाव, शेकटे बुद्रुक, बाडगव्हाण, मुरमी, कोनोशी, राणेगाव, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे खुर्द, सेवानगर, अमरापूर आदी गावातील १ हजार १५३ शेतकऱ्यांचे ८५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये गहू ३२०, हरभरा २७७, कांदा २३१, मका ५, टरबूज १, फळपीक २० हेक्टर अशा क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

Web Title: Untimely strike on 854 hectares in 16 villages of Shevgaon