श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या ‘महाराष्ट्र बारव मोहीम’अंतर्गत राज्यभर बारव शोध मोहीम सुरू आहे. त्यानुसार मुंबई येथील रोहन काळे व मनोज सीनकर यांनी आजपर्यंत १ हजार ४०० बारवांचे गुगल मॅपिंग पूर्ण केले आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील १५८ प्राचीन बारवांचा समावेश असून, श्रीगोंदा तालुक्यातील ५२ प्राचीन बारवांचे गुगल मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे गुगल मॅपच्या माध्यमातून प्राचीन बारवा जगभर पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्र बारव मोहीम उपक्रमात शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील प्राचीन बारवांचा शोध घेण्यात आला. यामध्ये शिवदुर्ग टीमच्या सदस्यांनी थेट गावोगावी जाऊन या सर्व बारवांचे ‘ऑन द स्पॉट लोकेशन’ व फोटो निश्चित केले.
यामध्ये राजेश इंगळे, सोमेश शिंदे, मारुती वागस्कर, गणेश कुदांडे, अक्षय गायकवाड, डॉ. चंद्रशेखर कळमकर, अजित दळवी, संकेत नलगे, संकेत लगड, डॉ. अभय शिंदे, चतुर्भुज कौठाळे, सुधीर ढवळे यांनी भाग घेतला.
तालुक्यात एकूण ९१ बारवांचा शोध शिवदुर्ग टीमने घेतला. त्यापैकी २९ बारवा काळानुसार पडझड होऊन बुजल्या अथवा मानवनिर्मित बुजविल्या गेल्या आहेत. त्यांची वेगळी नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये पारनेर ५३, नगर ३६, अकोले २३, पाथर्डी ११, कर्जत ८, नेवासा ६, राहुरी ६, संगमनेर ५, शेवगाव ४, राहाता ३, जामखेड २, कोपरगाव १, अशा नोंदी झाल्या आहेत.
----
श्रीगोंदा तालुक्यात प्राचीन काळातील शंभरहून अधिक बारवा असतील. आपला खूप मोठा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीसाठी स्थानिक जनतेच्या सहकार्याने जतन व संवर्धन करावा लागेल.
-राजेश इंगळे,
अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन
----
श्रीगोंद्यातील बारवांचे वैशिष्ट्य..
तालुक्यात आजही ६२ बारवा अस्तित्वात आहेत. देऊळगाव, बेलवंडी कोठार, लोणी व्यंकनाथ, पेडगावचा भुईकोट किल्ला येथील बारवा खूप प्राचीन आहेत. या बारवा सुमारे १ हजार वर्षांपेक्षाही जास्त कालखंडातील असाव्यात. चालुक्य, यादव, मोगल, मराठे, ब्रिटिश कालखंडातील बारवा सापडतात. स्वातंत्र्यानंतर खूपच कमी बारवा सापडतात. या बारवा मंदिर परिसरात, गावठाणात आहेत, तर काही बारवा खासगी शेतात आहेत. प्रत्येक बारव वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीगोंदा शहर परिसरात ११ बारवा आहेत, तर मांडवगण गावात सर्वांत जास्त ७ बारवा अस्तित्वात आहेत. हिंगणी येथील बारा मोटेची बारव सर्वांत मोठी आहे. निमगाव खलू येथे विटांची बारव, देवदैठण व मांडवगण येथे भूमिगत बारव आहे. येवतीची बारव ग्रामस्थांनी संवर्धित केली आहे. बेळवंडी कोठार, देऊळगाव, भानगाव, श्रीगोंदा, ढोरजा, कोळगाव, कोसेगव्हाण, येथील बारवामध्ये शिलालेख सापडतात. पारगाव सुद्रिक येथील बारव खोल आहे.
----
२३ श्रीगोंदा बारव
श्रीगोंदा येथील प्राचीन बारव.