कोऱ्हाळे हत्येप्रकरणी तिघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:21+5:302021-06-29T04:15:21+5:30

लोणी : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवरील वयोवृध्द पती-पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित ...

Three arrested in Korhale murder case | कोऱ्हाळे हत्येप्रकरणी तिघांना घेतले ताब्यात

कोऱ्हाळे हत्येप्रकरणी तिघांना घेतले ताब्यात

लोणी : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवरील वयोवृध्द पती-पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांच्या मुलासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे.

शनिवारी (दि. २६) रात्री शशिकांत श्रीधर चांगले (वय ६० ) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय ५५) या दोघा वयोवृध्द पती-पत्नीच्या डोक्यात फावडे मारून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी राहाता पोलीस कसून तपास करत आहेत. रविवारी (दि.२७) जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन स्कॉड डॉगच्या माध्यमातून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच रविवारी त्यांच्या कुटुंबातील दोन्ही मुले, सुना यांचे जाबजबाब घेण्यात आले. दरम्यान पोलिसांना संशय बळावल्याने मुलासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लवकरच या हत्येप्रकरणाचे धागेदोरे हाती लागणार असून या वयोवृध्द दांपत्याची हत्या कोणी आणि का केली, याबाबतचा उलगडा होणार असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Three arrested in Korhale murder case