शिक्षक बँकेचा अहवाल की फोटो अल्बम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:15+5:302021-08-27T04:24:15+5:30
अहमदनगर : शिक्षक बँकेच्या वार्षिक अहवालात भरमसाठ फोटो छापून संचालक मंडळाने त्याखाली आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका गुरुकुल ...

शिक्षक बँकेचा अहवाल की फोटो अल्बम
अहमदनगर : शिक्षक बँकेच्या वार्षिक अहवालात भरमसाठ फोटो छापून संचालक मंडळाने त्याखाली आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका गुरुकुल मंडळाने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजकीय पदाधिकारी व संचालक मंडळाचे फोटो आवश्यक असले तरी सत्ताधारी मंडळाने संबंध नसलेल्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो छापून अहवालाचा रंगीत अल्बम केला आहे. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आधारस्तंभ, प्रेरणास्थान, अशा गोंडस
नावाखाली अनावश्यक व्यक्तींच्या फोटोंसाठी अहवालाची अनेक रंगीत पाने वाया घालवली आहेत. बँकेचा सभासद मयत झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, यासाठी जाणत्या धुरीणांनी मयत निधी ठेव योजना सुरू केली. सत्ताधाऱ्यांनी या निधीतून जिवंत थकबाकीदारांचे कर्ज वसूल करण्याचा सपाटा सुरू केला. त्यासाठी या मयत निधीतून ८५ लाखांच्या वर रक्कम खर्ची टाकण्यात आली. ज्या थकबाकीदारांचे कर्ज बँक भरते, त्यातील अनेक शिक्षक निलंबित, तर काही बडतर्फ आहेत. काही शिक्षकांवर गुन्हे दाखल असून, त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. यांच्या कर्जाची जबाबदारी बँक घेतेच कशी? असा सवाल शिक्षक नेते रा.या. औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितीन काकडे, वृषाली कडलग, इमाम सय्यद, संतोष भोपे, शिवाजी रायकर, सुखदेव मोहिते, बाळासाहेब खेडकर, मिलिंद पोटे, अशोक कानडे, वैभव दिघे, सागर घालमे, जालिंदर गोरे, अशोक आगळे, दशरथ पवार, उत्तम गायकवाड, सुभाष गोल्हार, ज्ञानेश्वर बोडखे, सोमनाथ येलमामे, अनिल ओहोळ, जालिंदर खाकाळ यांनी दिला आहे.
.................
विकास मंडळाच्या इमारतीसाठी बँकेने मदत करावी
शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर म्हणाले, विकास मंडळाच्या इमारतीचे काम अपूर्ण आहे. पुढच्या पिढीच्या हाती आपण असे सांगाडे देऊन जाणार आहोत का? शिक्षक नेतृत्व अहंकारी नसावे. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सहकारात सहकार्यानेच कामे होतात. विकास मंडळाची इमारत पूर्ण करण्यासाठी शिक्षक बँकेने मदत करावी.
.............
या प्रश्नांची उत्तरे द्या
बँक शताब्दीच्या नावाखाली संचालक मंडळाने एक कोटीची तरतूद केली होती. त्यातील १ लाख ७८ हजार रुपये रक्कम शिल्लक दाखवली आहे. उर्वरित ९८ लाख रुपयांचे नेमके काय केले? आभासी पद्धतीने वार्षिक सभा होऊनही सभेचा ९ लाख ८३ हजार रुपये खर्च कसा झाला? याचा हिशेब संचालक मंडळाने जाहीर करावा, असे आवाहन शिक्षक नेते संजय कळमकर यांनी केले आहे.