पिंपळगाव माळवी : केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या स्ट्राइव्ह या प्रकल्पांतर्गत अहमदनगरमध्ये अहमदनगर ऑटो क्लस्टरमध्ये कमवा आणि शिका योजनेअंतर्गत १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांना मोफत औद्योगिक प्रशिक्षण सुरू होत आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याबरोबरच नोकरीची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन अहमदनगर ऑटो ॲण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दौलतराव शिंदे यांनी केले.
राज्यात अहमदनगर व औरंगाबाद या दोनच ठिकाणी या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. एकूण दोनशे विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण काळात विद्यावेतन मिळणार आहे. यावेळी अविनाश बोपर्डीकर, विजय इंगळे, मिलिंद कुलकर्णी, नागराज बडगिरी, ट्रेनिंग हेड विनोद जहागीरदार, वैभव खंडारे आणि अनिता रसाळ, उदय सूर्यवंशी, व्ही. आर. कुरापटी आदी उपस्थित होते. प्रशिक्षण २८ जुलै रोजी सुरू होणार आहे. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक कंपन्यांमध्ये कामाचा अनुभवही मिळणार आहे. केंद्र सरकारचे मानांकित केलेले प्रशस्तिपत्रक मिळणार आहे. यामध्ये सीएनसी प्रोग्रॅमर, मशीन इलेक्ट्रिकल मेन्टनन्स, मशिनिस्ट, वेल्डर या ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.