रात्रीच्या संचारबंदीची आता कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:46+5:302021-02-23T04:32:46+5:30

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ...

Strict enforcement of night curfew now | रात्रीच्या संचारबंदीची आता कडक अंमलबजावणी

रात्रीच्या संचारबंदीची आता कडक अंमलबजावणी

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचा आदेश पूर्वीचाच असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिला आहे. हा आदेश २३ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दुपारी आरोग्य यंत्रणेची नियोजन भवनात बैठक घेतली. कोरोना लॉकडाऊनबाबत दर महिन्याला आदेश जारी केला जातो. यापूर्वी २९ जानेवारीला नियमांचे पालन करण्याबाबतचा आदेश दिला होता. त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत फिरण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी ९ ते रात्री ९ ही दुकाने सुरू ठेवण्याची वेळ होती. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही व लग्न समारंभास ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या नियमांची जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी होत नव्हती. या २९ जानेवारीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देणारा नवा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी दिला. त्यानुसार या आदेशाची सोमवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू झाली आहे.

----------

या नियमांचे पालन आवश्यक

२९ जानेवारीचा आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील

२३ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत आदेशाची कडक अंमलबजावणी

रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी

पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

विवाह समारंभात ५०पेक्षा जास्त लोकांना मनाई

अंत्यसंस्कारास २० व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई

सार्वजनिक कार्यक्रमांनाही ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

हॉटेल, रेस्टाॅरंटमध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना परवानगी

सभा, संमलने, जत्रा, संस्थांच्या सभांसाठी ५० व्यक्तिंनाच परवानगी

मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर अनिवार्य राहील

-----------------

मंगल कार्यालयांना १० हजार रुपयांचा दंड

विवाह समारंभात ५० व्यक्तींपेक्षा जास्त लोक आढळले, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास १० हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मंगल कार्यालयावरील कारवाईचे अधिकार संबंधित भागातील पोलीस निरीक्षकांना देण्यात आला आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विशेष आदेश जारी केला आहे. मंगल कार्यालयात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी व्यवस्था असणे आवश्यक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाच्या मालकांविरूध्द कारवाई होईल.

Web Title: Strict enforcement of night curfew now