कारखानदारीसाठी खडतर हंगाम

By Admin | Updated: June 25, 2016 00:38 IST2016-06-25T00:30:01+5:302016-06-25T00:38:18+5:30

अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून

Stiff season for factories | कारखानदारीसाठी खडतर हंगाम

कारखानदारीसाठी खडतर हंगाम


अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून २२ पैकी किती कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटणार याबाबत सध्या तरी साशंकता आहे. साखरेचे पडलेले दर, वाढलेला उत्पादन खर्च, सरकारची अनास्था याचा फटका साखर कारखानदारीला बसलेला आहे. या परिस्थितीत कारखानदारी कशी टिकणार,असा प्रश्न आहे.
सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. सहकाराचे सर्वात मोठे जाळे नगर जिल्ह्यात असून सहकारी साखर कारखान्यासोबत खासगी साखर कारखानदारी जिल्ह्यात वाढलेली आहे. मात्र, घटलेले पर्जन्यमान, धरणातील पाण्याचा प्रश्न, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणारे पाणी यामुळे जिल्ह्यातील शेती उजाड झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका उसाच्या पिकाला बसलेला आहे.
मे महिन्यात प्रादेशिक सहसंचालक कार्यालय( साखर) यांनी काढलेल्या प्राथमिक अंदाजात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात १ लाख १२ हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक गाळपासाठी होते. यंदा हे क्षेत्र अवघे ६० हजार ९७२ हेक्टर क्षेत्र असल्याचे या अहवालात म्हटले आहे. गेल्यावर्षी ९२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होवून त्यातून १ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. साखर उताराही १०.९५ टक्के निघाला होता. उसाच्या कमतरतेमुळे यंदा ऊस तोडणी मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड राहणार आहे.
जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांना दीड लाखांच्या जवळपास कामगारांची गरज असते. यंदा निम्म्याने कारखाने बंद राहिल्यास त्याचा परिणाम तोडणी कामगारांवर होणार आहे. सरकारच्या कामगारांच्या उदासीन धोरणामुळे आधीच फरपट सुरू असणाऱ्या कामगारांसमोरील अडचणी वाढणार आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Stiff season for factories