शिवसेनेने नगरपंचायतीत सोडले मोकाट कुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:44+5:302021-02-23T04:32:44+5:30
शिर्डी : शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडत शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. ...

शिवसेनेने नगरपंचायतीत सोडले मोकाट कुत्रे
शिर्डी : शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडत शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास शिर्डी नगरपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप करत कोते यांनी नागरीकांना आपल्या परिसरातील मोकाट कुत्रे, मांजर व डुक्कर नगरपंचायतमध्ये आणून सोडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी बक्षीस योजना जाहीर केली आहे.
कोते म्हणाले, शहरात व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या कुत्र्यांनी अनेक भाविकांना व नागरीकांना चावा घेतलेला आहे. एरवी नागरीकांकडून भरमसाठ कर घेणाऱ्या नगरपंचायतो सत्ताधारी व मुख्याधिकारी पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आपण नगरपंचायतमध्ये मोकाट कुत्रे आणून सोडले आहेत.
नगरपंचायतने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास नागरीकांनी आपल्या भागातील कुत्रे नगरंपचायत कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन कोते यांनी केले आहे.
..............
बक्षिसांची रक्कम जाहीर
नागरिकांनी नगरपंचायतीत कुत्रे, मांजर, डुक्कर आणून सोडल्यास त्यांच्यासाठी आपण व्यक्तीगत बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. त्यानुसार कुत्र्याचे लहान पिल्लु दहा रूपये, मांजर दहा रूपये, मोठे कुत्रे ५० रूपये व डुक्कर नगरपंचायतीत आणून सोडल्यास शंभर रूपये बक्षीस देण्यात येणार आहे, असे कोते यांनी सांगितले.
...................
कुत्रे पकडण्यास कायदेशीर अडचणी आहेत. तरी नियमात राहुन आपण मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करू.
-काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी, नगरपंचायत