रमाई आवास योजनेत शेवगाव पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:32+5:302021-08-17T04:26:32+5:30

शेवगाव : सभापती क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली महाआवास अभियान योजनेंतर्गत शेवगाव पंचायत समितीने रमाई आवास योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक ...

Shevgaon Panchayat Samiti in Ramai Awas Yojana first in the district | रमाई आवास योजनेत शेवगाव पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम

रमाई आवास योजनेत शेवगाव पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम

शेवगाव : सभापती क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली महाआवास अभियान योजनेंतर्गत शेवगाव पंचायत समितीने रमाई आवास योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्वातंत्र्यदिनी अहमदनगर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सभापती क्षितिज घुले, गटविकास अधिकारी महेश डोके यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून यावर्षी २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत शंभरदिवसीय 'महाआवास अभियान-ग्रामीण' अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून शेवगाव पंचायत समितीने तालुक्यात एकूण ९६४ घरांचे उद्दिष्ट पूर्ण केले. यामुळे गोरगरीब, गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळाला.

'महाआवास' अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती मिळावी व पंचायत समितीला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन सभापती क्षितिज घुले यांनी अधिकाऱ्यांना करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय सूक्ष्म नियोजन केले होते.

या अभियानाच्या यशस्वितेसाठी महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाने समन्वय साधणे, या अभियानांतर्गत गरजू, पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेतून उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करून देणे, विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन नियोजन करणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे शंभर टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना तत्काळ पहिल्या हप्त्याचे वितरण करणे. उद्दिष्टांनुसार घरकुलांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे. अभियानाला गती देण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय, ग्रामकृती गटाचे व लाभार्थी मेळावे आणि बँक मेळावे आयोजित करणे आदी प्रकारचे नियोजन आखण्यात आले होते.

---

सर्व पदाधिकारी, अधिकारी विशेषतः ग्रामस्तरावर काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते, सर्व विस्तार अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामुळे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे.

-महेश डोके,

गटविकास अधिकारी, शेवगाव

----

तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेतून जास्तीतजास्त लाभ मिळावा. त्यांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी विशेष नियोजन आखण्यात आले होते. नियोजनाप्रमाणे प्रत्यक्षात गावपातळीवर काम करताना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेली मोलाची साथ व योगदान यामुळे गोरगरीब, गरजूंना या योजनेचा लाभ मिळाला.

-क्षितिज घुले,

सभापती, पंचायत समिती, शेवगाव

----

१६ शेवगाव१

रमाई आवास योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, गटविकास अधिकारी महेश डोके यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Shevgaon Panchayat Samiti in Ramai Awas Yojana first in the district