अहमदनगर : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनली असून अशा ठिकाणी लूटमार व महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार घडत आहेत. अशा ठिकाणी पेट्रोलिंग होत असली तरी गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवून गुन्हे करत आहेत.
शहरातील सरोज टाकी परिसरातील मोकळे मैदान, बालिकाश्रम ते बोल्हेगाव रस्ता, तपोवन रोडवरील भिस्तबाग महाल परिसर, कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज, जुने आरटीओ कार्यालय परिसर, बालिकाश्रम रस्त्यावरील कृषी कार्यालय परिसर आदी ठिकाणी बसून गुन्हेगार दारू, गांजा रिचवतात आणि रात्री चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट करतात तसेच एकटी महिला दिसली की, छेडछाडीचेही प्रकार घडतात. अशा ठिकाणी पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--------------
ही ठिकाणे धोक्याची
शहराजवळील चांदबीबी महाल, मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, वांबोरी घाट, केकताई परिसर आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. सध्या पावसाळा असल्याने येथे फिरायला जाणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. चोरटे आणि रोडरोमिओ यांच संधीचा फायदा घेतात. डोंगरात अथवा घाट परिसरात लपून बसलेले चोरटे पर्यटकांना अडवून लूटमार करतात तसेच महिलांच्या छेडछाडीचेही अनेक प्रकार या परिसरात घडले आहेत.
-------------------
रात्रीचा प्रवास ठरतोय घातक
नगर-पुणे रोडवरील चास परिसर, वांबोरी घाट, नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाट, निंबळक बायपास, कल्याण रोडवरील मार्केट यार्ड रस्ता आदी ठिकाणी रात्री वाहनचालकांना अडवून लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. लुटारू एकटे वाहन दिसले की, दुचाकी अडवी लावून त्यांना थांबवितात. हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जातो. बहुतांशी वेळा वाहनचालक व इतर प्रवाशांना मारहाण केली जाते. त्यामुळे या परिसरातील रात्रीचा प्रवास घातक ठरत आहे.
----------------------
पोलिसांकडे ठिकाणांची यादी पण...
ज्या ठिकाणी वारंवार लूटमारीच्या घटना घडत आहेत, अशा ठिकाणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या परिसरात रात्रीतून एकदा किंवा दोनदा पेट्रोलिंग केली जाते. चोरटे मात्र पोलिसांचे वाहन येऊन गेले की, प्रवाशांना लक्ष्य करतात. त्यामुळे नियमित पेट्रोलिंग सुरू असली तरी लूटमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत.