कोरोना नियम धुडकाविणारी जामखेडमधील १४ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:15+5:302021-03-26T04:20:15+5:30

जामखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर या नियमांचे पालन न करणारी १४ दुकाने सात दिवसांसाठी सील ...

Sealed 14 shops in Jamkhed violating Corona rules | कोरोना नियम धुडकाविणारी जामखेडमधील १४ दुकाने सील

कोरोना नियम धुडकाविणारी जामखेडमधील १४ दुकाने सील

जामखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर या नियमांचे पालन न करणारी १४ दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने गुरुवारी ही कारवाई केली.

शहरात प्रथमच अशी कारवाई झाल्याने नियम न पाळणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी रात्री शहरासह तालुक्यातील कोरोनाबाबतचा आढावा घेतला. जे दुकानदार सूचना पाळणार नाहीत, अशा लोकांची दुकाने सात दिवसांसाठी सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वत: काही दुकाने, हॉटेल यांचे फोटो काढून नगर परिषद प्रशासनाला दिले होते.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गुरुवारी शहरातील नगर-बीड रस्त्यावरील दुकाने, हॉटेल यांना भेट देऊन नगर परिषद प्रशासनाला आदेश दिले.

नगर परिषदेने याची तात्काळ दखल घेऊन शहरातील समृद्धी दूध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, एन. के. पॉवर टुल्स, घाडगे एजन्सी, स्वयंभूराज किराणा, महाराष्ट्र चायनीज सेंटर, शिवशंकर इलेक्ट्रॉनिक, रवींद्र कलेक्शन, समृद्धी पेढेवाले, महाराष्ट्र शूज सेंटर, मुंबई मोबाइल शॉपी ही दुकाने नगर परिषदेने ७ दिवसासांठी सील केली आहेत.

--

विजेचा अर्धा खर्च शासनाने करावा...

डॉ. आरोळे हॉस्पिटलचे संचालक रवी अरोळे व डॉ. शोभा आरोळे यांच्याबरोबर जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येथील कोविड सेंटरने आतापर्यंत साडेतीन हजार कोरोना रुग्णांवर औषधोपचारासह चहा, नाष्टा, दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. सध्याही येथे १८० रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या हे सेंटर आर्थिक अडचणीत आहे. येथील विजेचा अर्धा खर्च शासनाने करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकऱ्यांनी याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.

---

सूचना पाळल्यास लॉकडाऊन नाही...

अर्थव्यवस्थेची नाकेबंदी होऊ नये यासाठी शासनाच्या सूचना सर्वांनी पाळाव्यात. त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही. ज्यांनी यापूर्वी त्याचे पालन केले नाही, चुका केल्या त्याची शिक्षा त्यांनी भोगली आहे. त्यामुळे तुम्ही चुका करू नका. चुका करणाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही. त्यांच्या टेस्टिंग करून ॲडमिट केले. त्यांची काळजी घेतली. दुसरी लाट भयानक असल्याने शासनाच्या सूचना पाळून आपली काळजी घ्यावी, आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. सूचना पाळल्यास लॉकडाऊन नाही.

---

२५ जामखेड कारवाई

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी शहरातील १४ दुकाने सात दिवसांसाठी सील केली.

Web Title: Sealed 14 shops in Jamkhed violating Corona rules