संगमनेर : संगमनेर - अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्तीचे कामही रेंगाळले आहे. याबाबत शुक्रवारी (दि. १७) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेतली. या रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी ३ मार्च २०१९ रोजी संगमनेरात घाटघर - संगमनेर या महत्त्वपूर्ण रस्त्यासह बारी-राजूर-कोतुळ व रंधा-भंडारदरा-वारंघुशी या ८४ किलोमीटर लांबीच्या १६८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन केले होते. ‘हायब्रीड ॲन्युटी’ तत्त्वावर हे काम करण्यात येत होते. मात्र, अडीच वर्ष पूर्ण होऊनदेखील संगमनेर - अकोले रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
म्हाळुंगी नदीवरील संगमनेर शहर परिसरातील अकोले नाक्यावरील पुलाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना, संगमनेर-अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या खोदण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी या साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. तेथे मुरूम, खडी तशीच पडून आहे. डांबरीकरण न झाल्याने खडी उघडी पडली आहे. अपूर्ण सर्वच कामे तत्काळ सुरू करावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
-------------------