दरोडेखोरांना चोपले

By Admin | Updated: December 24, 2015 23:37 IST2015-12-24T23:31:00+5:302015-12-24T23:37:40+5:30

श्रीरामपूर : काही दिवसांपूर्वीच दरोडेखोरांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न मालुंजा येथील गावकऱ्यांनी हाणून पाडल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा दरोडेखोरांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

The robbers chipped | दरोडेखोरांना चोपले

दरोडेखोरांना चोपले

श्रीरामपूर : काही दिवसांपूर्वीच दरोडेखोरांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न मालुंजा येथील गावकऱ्यांनी हाणून पाडल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा दरोडेखोरांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी एकजूट व धाडस दाखवित पाठलाग करुन दरोडेखोरांना पकडून बेदम चोपून काढले.
दोन दरोडेखोर गंभीर जखमी असून त्यांना औषधोपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिसरा दरोडेखोर गावठी कट्ट्यासह पळाला. राजू भानुदास शिरसाठ (वय ३०, रा. सातपूर, नाशिक, हल्ली रा. घोगरगाव) व नितीन विश्वास गायकवाड (वय ३०, करजगाव, ता. राहुरी) अशी ग्रामस्थांनी चोपलेल्या जखमी दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडे ४-५ सीमकार्ड, छोट्या गॅस टाकीसह एक गॅसकटर, वीज मोटार, एक बंदुकीची गोळी मिळाली. अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, सहायक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रविवारी मध्यरात्रीनंतर मालुंजा सेवा संस्थेच्या इमारतीमधील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे कुलूप दरोडेखोर गॅस कटरच्या साह्याने तोडत होते. गॅस टाकीचा आवाज आल्याने काही तरुण व ग्रामस्थ जागे झाले. त्यांना पुन्हा दरोडेखोर गावात आल्याची चाहूल लागली. त्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधून गावातील इतरांना जागे केले. लोकांनी टोळी टोळीने गावच्या चारही दिशांना नाकेबंद केली. दरोडेखोरांना गाव जागे झाल्याचे लक्षात येताच ते पळून जात असताना ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घेराव घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी गावकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ले परतवत गावकऱ्यांनी २ दरोडेखोरांना पकडून बेदम चोपून काढले. तिसरा दरोडेखोर पकडत असताना त्याने गावठी कट्ट्याचा धाक दाखविल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या दोघांना गावकऱ्यांनी बांधून ठेवले.
पहाटे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण करुन त्यांच्याकडे दोघा दरोडेखोरांना सोपविण्यात आले. फरार दरोडेखोरास पकडण्याचे आश्वासन अप्पर अधीक्षक जाधव व सहायक निरीक्षक परदेशी यांनी दिले. रविवारी मध्यरात्रीच्या या गुन्ह्याची सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरूच होते.
(प्रतिनिधी)

Web Title: The robbers chipped