जिल्ह्यातील २६ लाख लोकांमध्ये अँटिबॉडीजची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:41+5:302021-07-30T04:22:41+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ५८ टक्के म्हणजे जवळपास २६ लाख लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ...

जिल्ह्यातील २६ लाख लोकांमध्ये अँटिबॉडीजची निर्मिती
अहमदनगर : जिल्ह्यातील ५८ टक्के म्हणजे जवळपास २६ लाख लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयएमसीआर) या संस्थेने काढला आहे. आयएमसीआरने अहमदनगर जिल्ह्यात दहा गावांमध्ये सिरो प्रिव्हलन्स सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल २३ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील बीड, सांगली, अहमदनगर, जळगाव, परभणी, नांदेड या सहा जिल्ह्यात सेरो सर्वेक्षण केले होते. हा सर्वेक्षणाचा चौथा टप्पा होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरात किती प्रमाणात ॲटिबॉडीज तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी हे सिरो सर्वेक्षण करण्यात येते. याचाच दुसरा अर्थ या सर्वेक्षणात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांच्या शरीरात ॲंटिबॉडी तयार झाल्या किंवा त्यांना कोरोना होऊन गेला असा आहे, असे येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात दहा गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ४१९ जणांचे रक्तनमुने घेण्यात आले होते. त्यापैकी २४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण ५८ टक्के आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाख आहे. या लोकसंख्येशी तुलना केल्यास २६ लाख लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्थ केअर असलेल्या १०१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे प्रमाण ९२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात ५२ हजार आरोग्य कर्मचारी आहेत. त्या संख्येच्या प्रमाणात ४७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरात ॲंटिबॉडी तयार झाल्याचे या अहवालावरून निष्कर्ष काढण्यात आला आहे.
--------------
असे घेतले नमुने
एका गावात चार भागातील लोकांचे रक्तनमुने घेण्यात आले. अशा जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली होती. एका भागात ६ ते ९ वयोगटांतील १, ९ ते १८ मधील ३ आणि १८च्या पुढील १५ असे एकूण १९ नमुने घेण्यात आले होते. एका गावातून ४० असे दहा गावांतून ४०० नमुने घेण्यात आले होते.