ज्वारीच्या आगारात कांद्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:40+5:302021-09-25T04:20:40+5:30
योगेश गुंड केडगाव : ज्वारीचे प्रमुख आगार असणाऱ्या नगर तालुक्यात आता शेतकरी ज्वारीऐवजी कांद्याला पसंती देऊ लागले आहेत. सततच्या ...

ज्वारीच्या आगारात कांद्याला पसंती
योगेश गुंड
केडगाव : ज्वारीचे प्रमुख आगार असणाऱ्या नगर तालुक्यात आता शेतकरी ज्वारीऐवजी कांद्याला पसंती देऊ लागले आहेत. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मशागतीची कामे खोळंबली आहेत. पेरणीयोग्य वापसा नसल्याने ज्वारीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तालुक्यात ८४ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे.
तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नसल्याने त्याचा फटका खरीप पिकांना झाला. तालुक्यात परतीचा पाऊस जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची तयारी सुरू केली. तालुक्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गोकुळ अष्टमी किंवा श्रावणी पोळा झाला की, लगेच ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू होते. यंदा पावसाने उघडीप न दिल्याने शेतातील मशागतीची कामे खोळंबली आहेत. वाळकीसह काही भागात ज्वारीच्या पेरण्या उरकल्या आहेत.
ज्वारीबरोबर कांदा लागवडीचे प्रमाणही वाढले आहे. काही ठिकाणी कांदा पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. यंदा ८४ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यातील निम्म्या क्षेत्रावर म्हणजे जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन आहे. गहू व हरभरा यांच्या पेरण्या उशिरा होत असल्याने सध्या ज्वारीच्या पेरण्या उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. गेल्या वर्षीही ४० हजार हेक्टरचे नियोजन होते. मात्र, २८ हजार हेक्टरवरच ज्वारीच्या पेरण्या झाल्या. यंदाही त्यात घट होण्याची शक्यता आहे.
---
...असे आहे रब्बी नियोजन
पीक : क्षेत्र हेक्टरमध्ये
ज्वारी : २८ हजार ३१६
गहू : ११ हजार ९५६
हरभरा : १३ हजार ९७२
कांदा : १८ हजार ५५७
चारा पिके : ८ हजार ५३४
भाजीपाला : २ हजार २२८
---
पावसाने विश्रांती घेतल्यास ज्वारीच्या पेरणीला वेग येईल. सध्या पेरणीसाठी योग्य वापसा होण्याची प्रतीक्षा आहे. तालुक्यात १ हजार ७५० शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ७०० हेक्टर क्षेत्रासाठी एकूण ७० क्विंटल ज्वारीच्या बियाण्याचे वाटप केले आहे.
-पोपटराव नवले,
कृषी अधिकारी, नगर तालुका
----
का घटते ज्वारीचे क्षेत्र...
लाल कांदा शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे पीक ठरत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. जिरायत क्षेत्रही सिंचनाखाली आणून तेथेही लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. जेऊर परिसरातील इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी येथे खासगी डोंगर सपाट करून तिथे क्षेत्र काढण्यात आले आहे. पूर्वी जिथे पावसाच्या भरवशावर ज्वारीची पेरणी होत होती ते क्षेत्र ओलिताखाली आणून शेतकरी कांद्याची लागवड करत आहेत. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसून येते.