लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या नटराज कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऑक्सिजनच्या टाक्यांची मागणी केली आहे.
महापालिकेने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. परंतु, रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना येथील शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. परंंतु, तिथे ऑक्सिजनचे बेड रिकामे नाहीत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालयांत पायपीट करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पावले उचलली आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ५० ऑक्सिजनच्या टाक्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ टाक्या प्राप्त झाल्या असून, नटराज कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
.....
- कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ऑक्सिजनच्या टाक्या उपलब्ध झालेल्या आहेत. नटराज कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
- शंकर गोरे, आयुक्त
--------------------
जिल्हा प्रशासनाची कंट्रोल रुम
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. या दोन्ही गोष्टींचा तुटवडा असल्याने बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४ तास कंट्रोल रुम कार्यान्वित केली आहे. नागरिकांनी (०२४१- २३२२४३२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. या कंट्रोलरुमसाठी नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून कातकडे हा काम पाहणार आहेत.