मुंगूसगाव-विसापूर रस्ता खोदला, टाकले काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:37+5:302021-07-30T04:22:37+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर-मुंगूसगाव रस्ता शेतकऱ्यांनी खोदून, काट्या टाकून बंद केला आहे. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याने हा प्रकार ...

Mungusgaon-Visapur road dug, cut | मुंगूसगाव-विसापूर रस्ता खोदला, टाकले काटे

मुंगूसगाव-विसापूर रस्ता खोदला, टाकले काटे

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर-मुंगूसगाव रस्ता शेतकऱ्यांनी खोदून, काट्या टाकून बंद केला आहे. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याने हा प्रकार घडला आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी सरपंच-उपसरपंचांसह ग्रामस्थांनी दोन ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

हा रस्ता जुना व फार पूर्वीपासून वहिवाटीचा असून १९९६ साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे करून या रस्त्याचे अस्तित्व संपविले, असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे. गेल्या आठवड्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. या रस्त्याचा वाद ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे नेला आहे. उपोषणाची नोटीस दिली आहे. हा सार्वजनिक प्रश्न गंभीर बनला असताना आठवडाभरात कोणताही सक्षम शासकीय अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हा रस्ता नकाशाप्रमाणे झालेला नसून १९९६ मध्येही आमच्या जमिनीतून दडपशाहीने या रस्त्याचे आमदार निधीतून डांबरीकरण करण्यात आले. आता पुन्हा आमच्यावर दबाव आणून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यास आमचा विरोध आहे. काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी हा रस्ता खोदून टाकला. त्यामुळे आम्हाला शेतात जाणे कठीण झाले आहे. या रस्त्याच्या बाबतीत काही लोकांचे ऐकून एकतर्फी निर्णय न देता आमचे मत विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी संबंधित शेतकरी विठ्ठल नंदराम धुमाळ, सुधीर विठ्ठल धुमाळ व आकाश सुधीर धुमाळ यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. एकंदरीत हा मुख्य रस्ता वादात सापडल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.

----

रस्त्याचा पंचनामा केला. वाद मिटेपर्यंत ग्रामस्थांनीच हा रस्ता खोदून बंद केला, अशी माहिती मिळाली. याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला. तेच पुढील निर्णय घेतली.

-डहाळे,

मंडळाधिकारी

----

२९ मुंगूसगाव रोड

शेतकऱ्यांनी बंद केलेला मुंगूसगाव-विसापूर रस्ता.

Web Title: Mungusgaon-Visapur road dug, cut