मुळा धरण ७५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:31+5:302021-09-07T04:26:31+5:30

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण सोमवारी (दि. ६) ७५ टक्के भरले आहे. २६ हजार दशलक्ष ...

The Mula dam is 75 percent full | मुळा धरण ७५ टक्के भरले

मुळा धरण ७५ टक्के भरले

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण सोमवारी (दि. ६) ७५ टक्के भरले आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये १९५०७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७५.०२ टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.

मुळा धरणाच्या पाण्याची पातळी १७९९.७५ फूट झाली आहे. धरणात सध्या उपयुक्त पाण्याचा साठा १५००७ (६९.८०) इतका आहे. मुळा धरणाच्या माथ्यावर येत्या तीन-चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुळा धरण भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत. धरणाकडे पारनेर तालुक्यातून पाण्याची आवक सुरू आहे. सोमवारी दिवसभरात धरणाकडे १६८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला होता. कोतूळ येथून पाण्याची आवक झाली नाही. कोतूळ येथे पावसाच्या पाण्याची नोंद झालेली नाही. मुळानगर येथे सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षीचा अतिरिक्त दोन हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात जमा होता. तरीदेखील यंदा मुळा धरण भरण्यास विलंब होत आहे. मुळा धरणातून गेल्या वर्षी चार सप्टेंबर रोजी जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले होते. यंदा मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. लाभक्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

........

येत्या तीन-चार दिवसांत घाटमाथ्यावर पाऊस सुरू होण्याची चिन्हे आहेत. पारनेर तालुक्यातील पाण्याची आवक सुरू असून, १६८ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. यंदा मुळा धरण भरण्याची शक्यता आहे.

-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण शाखा अभियंता

Web Title: The Mula dam is 75 percent full