सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:06+5:302021-07-30T04:22:06+5:30
शेवगाव : तालुक्यातील आखतवाडे येथील विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी पतीसह चौघांविरोधात ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
शेवगाव : तालुक्यातील आखतवाडे येथील विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली रमेश बडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.
शेवगाव पोलीस ठाण्यात विवाहित महिला रविवार (दि.२५) पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (दि.२७) वैशालीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याबाबत मयत विवाहितेचे वडील बाळू कोंडिबा खाडे (रा. गुंळज, ता. गेवराई, जि. बीड) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नवीन शेती व संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी वैशालीचा सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ होत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी रमेश शहादेव बडे (पती), सतीश शहादेव बडे (दीर), शहादेव नामदेव बडे (सासरा), हौसाबाई शहादेव बडे (सासू) सर्व रा. आखतवाडे, ता. शेवगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.