संवादाची दरी बिघडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:46+5:302021-09-07T04:26:46+5:30

श्रीरामपूर : कोविडमुळे अनेक लोकांवर घरातच बसून राहण्याची वेळ आली. अगदी शेजारच्या घरी जाऊन संवाद साधणे बंद झाले. मित्र ...

Make the communication gap worse | संवादाची दरी बिघडवू

संवादाची दरी बिघडवू

श्रीरामपूर : कोविडमुळे अनेक लोकांवर घरातच बसून राहण्याची वेळ आली. अगदी शेजारच्या घरी जाऊन संवाद साधणे बंद झाले. मित्र परिवार व नातेवाईक दुरावले गेले. या सर्व गोष्टींचा परिणाम माणसांच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे.

लॉकडाऊन संपताच आता मानसिक स्वास्थ्य खराब झालेले लोक उपचार घेताना दिसून येत आहेत. संवाद हरपल्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा, व्यसनाधीनता अशा समस्या वाढल्या आहेत. मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एकमेकांशी संवाद साधून मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनामध्ये उत्साह कायम राहतो. मात्र मागील दीड वर्षांपासून कोविड संसर्गामुळे सर्वच जण घरामध्येच कोंडून राहिले आहेत. त्यामुळे संवाद कमी झाला आहे. नागरिकांच्या हालचाली कमी झाल्या व त्यातून शारीरिक व्याधीही जडल्या. संवादाअभावी एकटेपणा आला. नैराश्य, स्मृतिभ्रंश, चिंता वाढली. तरुणांमध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले. शिवाय तरुण एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जात आहेत.

---------

मन हलके करणे हाच उपाय

कोविड काळात अनेकजण घरात राहिले. त्यामुळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले. संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाइलवरून संवाद साधला जात आहे. मात्र प्रत्यक्ष भेटून केलेल्या संवादातून मन हलके होते. मोबाइलद्वारे ते होईलच असे नाही. मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

---------

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...

एकमेकांशी संपर्क करण्याची माध्यमे सध्या वाढली असली तरी त्यातून विसंवादच जास्त होताना दिसून येत आहे. असुरक्षितता व त्याचबरोबर मला महत्त्व दिले जात नाही किंवा मीपणाची वृत्ती यामुळे विसंवाद निर्माण होतात. स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी समाजाशी उत्तम प्रकारचा संवाद असणे महतत्त्वाचे आहे.

डॉ. संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर.

----------

Web Title: Make the communication gap worse