महाविकास आघाडी नगरला बनविणार ग्रीन सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:44+5:302021-07-30T04:22:44+5:30
अहमदनगर : पुणेच्या धर्तीवर नगरला ग्रीन सिटी बनविण्याचा संकल्प महापालिकेतील महाविकास आघाडीने केला आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी प्रमुख रस्त्यांच्या ...

महाविकास आघाडी नगरला बनविणार ग्रीन सिटी
अहमदनगर : पुणेच्या धर्तीवर नगरला ग्रीन सिटी बनविण्याचा संकल्प महापालिकेतील महाविकास आघाडीने केला आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी प्रमुख रस्त्यांच्या बाजूने मोठी १० ते १२ फूट उंचीची पाच हजार झाडे लावण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात वृक्षसंवर्धन समितीची बैठक झाली. बैठकीला आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगररचना विभागाचे संचालक राम चारठणकर, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, उद्यान विभागाचे प्रमुख मेहर लहारे आदी उपस्थित होते. वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष बारस्कर यांनी शहरभर वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेण्यात आली. शहर व परिसरातून जाणारे महामार्ग, विकास आराखड्यातील मोठ्या रस्त्यांच्या बाजूने मोठी उंच झाडे लावण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या बाजूने नगररचना विभागाने खुणा केलेल्या जागेत झाडे लावण्यात येणार असून, झाडे लावण्याचे काम खासगी संस्थेला देण्याची सूचना बारस्कर यांनी मांडली. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली. प्रभाग समिती कार्यालयनिहाय चार स्वतंत्र निविदा मागविण्यात येणार आहेत. संबंधित संस्था पुढील तीन वर्षे वृक्षांचे संवर्धन करील. त्यावर उद्यान विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवतील. त्यांना प्रत्येकाला रस्त्यांची जबाबदारी दिली जाईल. कर्मचाऱ्यांकडून नियमित अहवाल मागविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. रस्त्यांची यादी तयार करून ती नगररचना विभागाला दिली जाणार असून, नगररचना विभाग रस्त्यांची रुंदी निश्चित करण्याच्या सूचना या वेळी आयुक्त गोरे यांनी केल्या.
....
वृक्षकर झाडे, उद्यानावरच खर्च करणार
महापालिका नागरिकांकडून अर्धा टक्का वृक्षकर वसूल करते. परंतु, पूर्वी तो इतर कामांसाठी वापरला जात होता. आयुक्त गोरे यांनी वृक्षकराचे स्वतंत्र खाते तयार करण्याच्या सूचना केल्या असून, हा निधी फक्त उद्याने आणि वृक्ष संवर्धनासाठीच खर्च केला जाणार असल्याचे आयुक्त गोरे यांच्याकडून सांगण्यात आले.
....
ड्रेनेज लाइनवर झाडे कशी लावणार
शहरातील कुष्ठधाम रस्त्याच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची लाइन, ड्रेनेज लाइन, केबल टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे झाडे लावण्यासाठी जागा शिल्लक नाही, असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर रस्त्यांची रुंदी निश्चित करून त्यानुसार झाडे लावण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे.
...
सामाजिक संस्थांना आवाहन
शहर व परिसरात विविध सामाजिक संस्था, कारखाने वृक्ष लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यामार्फत झाडे लावण्यात येणार असून, शहरातील सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले आहे.
..
सूचना: फोटो २९ महापालिका नावाने आहे.