काष्टी : रानडुकराची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्याचा अडकून मृत्यू झाल्याची घटना वांगदरी (ता. श्रीगोंदा) शिवारात रविवारी घडली. अन्न, पाणी वेळेवर न मिळाल्याने बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याचा अहवाल वनाधिकाऱ्यांनी दिला आहे.
रविवारी सकाळी वांगदरी येथील दिगंबर तात्यासाहेब भुजबळ यांच्या शेतात रानडुकरासाठी लावलेल्या शिकारीच्या जाळ्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांना माहिती दिली. त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जुन्नर येथील येथील रेस्क्यू पथकाने बिबट्याला पकडले आणि काही वेळात बिबट्याने प्राण सोडला.
बेलवंडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत खटके यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. बिबट्याच्या पोटात अन्न, पाणी नव्हते, घसा कोरडा पडला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.
---
वनविभागाच्या बेजबाबदारपणाचा बळी
बिबट्याला पकडण्यासाठी जिल्ह्यात तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. त्यामुळे नेहमी जुन्नरचेच पथक बिबट्याला पकडण्यासाठी बोलवावे लागते. पथक घेण्यास विलंब होतो. त्यामुळे स्थानबद्ध बिबट्याचे हाल होतात. रेस्क्यू पथक लवकर आले असते तर कदाचित अन्न, पाण्याविना बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला नसता. बिबट्याला जीवदान मिळाले असते. हा वनविभागाच्या बेजबाबदारपणाचा बळी आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.