Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:23 IST

Hanta Virus : हंता व्हायरसने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

हंता व्हायरसने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये ताप, पोटाच्या गंभीर समस्या, वेगाने पसरणारा न्यूमोनिया आणि 'एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम' यांसारखी लक्षणं दिसून आली आहेत. सध्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, हा व्हायरस माणसांपर्यंत पोहोचला कसा, हा मोठा प्रश्न आहे.

हंता व्हायरस म्हणजे काय?

हंता व्हायरस हा मुख्यत्वे उंदीर, खार यांसारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांची विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या संपर्कात आल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. हा व्हायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याचं प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे. १९९६ मध्ये 'अँडीज व्हायरस' (हंता व्हायरसचा एक प्रकार) मुळे माणसाकडून माणसाकडे संसर्ग झाल्याचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. क्रूझवर हा प्रसार नक्की कसा झाला, याचा शोध अजून सुरू आहे.

हंता व्हायरसची लक्षणं आणि सिंड्रोम

सीडीसीच्या (CDC) मते, या व्हायरसमुळे दोन प्रकारचे गंभीर सिंड्रोम होतात

हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS)

हा प्रकार फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि जीवघेणा ठरू शकतो.

सुरुवातीची लक्षणं -  थकवा, ताप, स्नायू दुखणं, डोकेदुखी, चक्कर येणं, थंडी वाजणं आणि पोटाचे विकार (उलट्या, जुलाब).

गंभीर लक्षणं - १० दिवसांनंतर खोकला आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. फुफ्फुसात पाणी साचल्यामुळे छातीत आकडल्यासारखं वाटते. या आजारात मृत्यूचं प्रमाण ३८% इतकं असू शकतं.

हेमोरेजिक फीवर विथ रेनल सिंड्रोम

हा आजार किडनीवर परिणाम करतो.

लक्षणं - डोकेदुखी, पाठ आणि पोटात दुखणं, ताप, अंधूक दिसणं, अंगावर लाल पुरळ येणं, लो ब्लड प्रेशर आणि रक्तस्राव. गंभीर परिस्थितीत किडनी निकामी होऊ शकतं. यामध्ये मृत्यूचं प्रमाण ५ ते १५ टक्के असते.

उपचार पद्धती

हंता व्हायरसवर अद्याप कोणताही ठोस किंवा निश्चित उपचार उपलब्ध नाही. 

रुग्णाला 'सपोर्टिव्ह केअर' दिली जाते, म्हणजेच दिसणाऱ्या लक्षणांवर उपचार केले जातात.

रुग्णाला पुरेसा आराम आणि हायड्रेटेड  राहण्याचा सल्ला दिला जातो.

फुफ्फुसांचा त्रास असल्यास 'इंट्यूबेशन' किंवा 'ब्रीदिंग सपोर्ट' दिला जातो.

किडनीवर परिणाम झाल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी 'डायलिसिस'चा आधार घ्यावा लागतो.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Hanta Virus claims lives: Symptoms, transmission, and treatment explained.

Web Summary : Hanta virus, spread by rodents, has caused three deaths. Symptoms include fever, pneumonia, and respiratory distress. Treatment focuses on supportive care, as no specific cure exists. Early detection and supportive care are crucial.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स