अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीकडे नेत्यांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:51+5:302021-02-23T04:32:51+5:30
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालाची साक्षांकित प्रत सोमवारी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाला सादर करण्यात ...

अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीकडे नेत्यांच्या नजरा
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालाची साक्षांकित प्रत सोमवारी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाला सादर करण्यात आली आहे. सहनिबंधक कार्यालयाकडून राजपत्र प्रसिध्द केले जाईल. राजपत्र प्रकाशित झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा सहकारी बँकेवर विविध मतदारसंघातून २१ संचालक निवडूण आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे. येथील उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणूक निकालपत्राची साक्षांकित प्रत नाशिक येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयास सादर करण्यात आली आहे. त्यानुसार सहनिबंधक कार्यालयाकडून नवीन संचालकांची नावे राजपत्रात प्रकाशित केले जाईल. सहनिबंधक कार्यालयाने प्रसिध्द केलेले राजपत्र येथील कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सात दिवसांत सभा घेऊन निवडणूक अध्यक्ष व उपाध्य निवडण्यात येतील. राजपत्रात सदस्यांची नावे प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूकीची प्रक्रिया सुरू होईल.
....
तज्ञ संचालकसाठी रस्सीखेच
जिल्हा बँकेत दोन तज्ञ संचालकांची नेमणूक करण्यात येते. मागील पंचवार्षिक संचालक मंडळात माजी आमदार पांडूरंग अभंग व राजेंद्र नागवडे यांची तज्ञ संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यावेळी तज्ञ संचालक म्हणून बँकेवर जाण्यासाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
..
काय आहे नियम
सन १९९७च्या घटना दुरुस्तीनुसार तज्ञ संचालक म्हणून नेमणूक केली जाणारी व्यक्ती सीए किंवा उच्च शिक्षित असावी. किंवा संबंधित व्यक्तीला जिल्हा बँकेच्या कारभाराचा प्रदिर्घ अनुभव असावा, असा नियम आहे. त्यामुळे माजी संचालकांना या पदावर संधी दिली जाऊ शकते.