काश्मीरचे सफरचंद बहरले कोपरगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:22+5:302021-07-30T04:22:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव (जि. अहमदनगर) : सफरचंद म्हणताच आपल्यासमोर काश्मीरसह बर्फाळ प्रदेशांचे नाव समोर येते. सफरचंदासाठी पोषक हवामान ...

Kashmir apples bloom in Kopargaon | काश्मीरचे सफरचंद बहरले कोपरगावात

काश्मीरचे सफरचंद बहरले कोपरगावात

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव (जि. अहमदनगर) : सफरचंद म्हणताच आपल्यासमोर काश्मीरसह बर्फाळ प्रदेशांचे नाव समोर येते. सफरचंदासाठी पोषक हवामान आपल्याकडे नाही. मात्र, तरीही कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील ५९ वर्षीय ध्येयवेड्या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात सफरचंदाची बाग फुलवून दाखविली आहे. त्यांच्या झाडांना काही प्रमाणात फळेदेखील लगडली आहेत.

सुहास वाबळे हे कृषी उच्च पदवीधर आहेत. त्यांची सुरेगाव शिवारात साडेबारा एकर शेती आहे. या शेतीत ते नवनवीन प्रयोग करीत असतात. मे - २०१९ मध्ये शेतीविषयक परिसंवाद आणि मार्गदर्शनासाठी वाबळे हे राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यातील एका गावात गेले होते. त्यावेळी त्या गावात सुमारे ४३ ते ४४ डिग्री तापमानात सफरचंदाची बहरलेली बाग दिसली. प्रत्येक झाडाला ३५० ते ४०० फळे लागलेली होती. हरिमन ९९ या उष्ण हवामानात बहरणाऱ्या सफरचंदाच्या प्रजातीचे जनक हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांचीही भेट घेतली. हरिमन ९९ या सफरचंदाच्या वाणाची सुमारे ४०० रोपे आणून २० जानेवारी २०२० ला शेतात लागवड केली. सेंद्रिय औषधे, खते यांचा वापर केला. सुमारे दीड वर्षाच्या काळात ही सफरचंदाची झाडे चांगलीच बहरली आहेत.

वाबळे म्हणाले, सफरचंदाचे भारतात हिमाचलमधील सोलन येथे संशोधन केंद्र असून यामध्ये २० जातीच्या सफरचंदाची रोपे असून त्यातील १७ जाती या हाय चिलिंग आहे. हाय चिलिंग म्हणजे झाडावर बर्फ पडल्याशिवाय फुले बहरत नाहीत. तर तीन जाती या उष्ण हवामानात फुले बहरवून फळ देतात. यात हरिमन ९९, डोरसेट आणि गाला या आहेत. त्यापैकी हरिमन ९९ या जातीची रोपे आणून बाग तयार केली. या झाडांचे आयुष्य हे तीस ते चाळीस वर्षांचे असून साधारण आठ ते दहा वर्षात झाडांची उंची बारा ते पंधरा फुटांपर्यंत जाते. ती पूर्ण सेंद्रिय खत वापरल्याने पहिल्या दोन वर्षात सुमारे अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा आहे.

..............

जानेवारीमध्ये धरता येईल बहार...

बर्फाळ प्रदेशात डिसेंबर ते जानेवारीत बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे झाडांना पानेच नसतात. या झाडांना फेब्रुवारीनंतर पाने येतात व मार्च-एप्रिलमध्ये फुले येतात. त्यानंतर सफरचंद येण्यास सुरुवात होते. याउलट आपल्याकडे येणाऱ्या या झाडांना जानेवारीमध्ये बहार येतो. मे-जूनमध्ये सफरचंद तयार होतात. त्यामुळे तिकडचा माल येण्याअगोदरच आपली फळे विक्री होऊन चांगला फायदा मिळू शकतो.

.........

अशी केली लागवड

एक एकर क्षेत्रात १२ बाय १० फूट अंतरावर रोपांची लागवड केली आहे. झाडांची लागवड करताना जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंचीचे बेड तयार करून त्यावर झाडांची लागवड केली आहे. कारण जमिनीवर जास्त पाणी साचून झाडे दगावण्याची भीती असते.

........

सव्वा लाख आतापर्यंत झाला खर्च

या सफरचंदाच्या बागेवर आतापर्यंत सुमारे सव्व्वा लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये ४० हजार रुपयांची ४०० रोपे व इतर खर्चात मशागत, व्यवस्थापन व सेंद्रिय औषधे, खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीच्या शोध घेण्यासाठी झाला आहे.

.........

संशोधनानंतर वीस वर्षात या देशी वाणाची रोपे जर्मनीपर्यंत पोहोचली. मात्र, राहुरी विद्यापीठात अद्यापर्यंत या वाणाची रोपे उपलब्ध नाहीत. ही शासनाची शेतकऱ्यांप्रति असलेली मोठी अनास्था आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठात सेंद्रिय विभाग असणे आवश्यक आहे.

- सुहास वाबळे, प्रयोगशील शेतकरी, सुरेगाव

Web Title: Kashmir apples bloom in Kopargaon