पंचवीस वर्षांपासून नुसतीच चर्चा; अतिक्रमण हटविणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST2021-07-30T04:23:03+5:302021-07-30T04:23:03+5:30
जवळे : जवळे (ता.पारनेर) येथील अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नुसतीच चर्चा होत आहे. मात्र प्रत्यक्ष ...

पंचवीस वर्षांपासून नुसतीच चर्चा; अतिक्रमण हटविणार कधी?
जवळे : जवळे (ता.पारनेर) येथील अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नुसतीच चर्चा होत आहे. मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण हटविणार कधी? असा सवाल ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपस्थित केला.
जवळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणातील मोकळ्या जागेत दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. पंचवीस वर्षापासून वर्षातून किमान दोन ते तीन वेळा मासिक सभेत अतिक्रमणाचा विषय निघतो. चर्चा होते. मात्र ग्रामसभेतही तोडगा निघत नाही. त्यामुळे अतिक्रमणांचा विषय जैसे थेच राहतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुभाष आढाव होत्या. दोन दिवसांपूर्वी गावातील मुख्य वेशीलगत अतिक्रमण झाले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यावर आढाव म्हणाल्या, अनेक दिवसांपासून गावातील शॉपिंग सेंटरसाठी ही जागा राखीव आहे. या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये. याबाबत अनेक वेळा सूचना देऊनही अतिक्रमण होत आहेत. याबाबत कारवाई केली जाईल.
डॉ. रायचंद आढाव म्हणाले, गावातील राहायला जागा नसलेल्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीने साथ देणे गरजेचे आहे. पोलीस पाटील बबनराव सालके म्हणाले, पंचवीस वर्षांपासून अनेक मासिक सभा, ग्रामसभा अतिक्रमणांवर चर्चेसाठी घेण्यात आल्या. ठराव घेण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चाललेले आहे. त्यामुळे काही स्थानिक ग्रामस्थ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने योग्य ते निर्णय घेऊन कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किसन रासकर, शिवाजी धोंडीबा सालके, माजी सरपंच सुभाष आढाव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रामराव सालके, अशोक ज्ञानदेव सालके, सोनाली संदीप सालके, मनीषा कानिफनाथ पठारे, नीता काळू साळवे, कांता केरू जाधव, ग्रामसेवक शिवाजी खामकर, तलाठी दीपक साठे, ग्रामस्थ उपस्थित होते.