मुळा नदीतून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:40+5:302021-09-07T04:26:40+5:30

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठारभागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. या वाळूतस्करीकडे ...

Illegal sand extraction from radish river | मुळा नदीतून अवैध वाळू उपसा

मुळा नदीतून अवैध वाळू उपसा

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठारभागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. या वाळूतस्करीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या अवैध वाळू वाहतुकीने शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे व वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे पोलीस महामार्गावर विनामास्क नागरिकांवर कारवाई करत असताना त्यांच्या समोरून हे अवैध वाळूची वाहने जातात त्याकडे पोलीस पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

संगमनेर तालुक्यात वाळूचा अधिकृत लिलाव झालेला नाही. असे असतानाही मुळा नदी पात्रातून अनेक वाहनांमधून वाळूची सर्रास वाहतूक केली जाते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने मुळा नदीला वाहते पाणी कमी आहे. वाळूतस्कर अत्याधुनिक यंत्र सामग्रीने वाळूउपसा करत आहे. पठार भागातील शेळकेवाडी, खंदर माळवाडी, नांदूर खंदरमाळ, खैरदरा, जांबूत, साकूर आदी गावांच्या मुळा नदी पात्रालगत व शेतजमिनीतून बेसुमार वाळूउपसा सुरु आहे. वाळू तस्करांना ५ ते ८ हजार रुपयांपर्यंत प्रति ब्रास पैसे मिळतात. अंतराप्रमाणे भाव काढला जातो. मालवाहू ट्रक, डंपर, ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनांचा वापर केला जात आहे. नदीपात्रात पाणी असताना पोकलेन, जेसीबीचा वापर वाळू उपशासाठी होत आहे.

वाळू तस्करांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे पोलीस अवैध उपशाकडे कानाडोळा करत असल्याचा उघड आरोप ग्रामस्थ करतात. मुळेच्या वाळूला पुणे जिल्ह्यात मोठी मागणी असून ती आळेफाटा मार्गे पुणे, ठाणे जिल्ह्यात पाठवली जाते. मुळा लगतच्या खैरदरा परिसरातून नित्याने २५ ते ३० वाहनांतून पुणे-नाशिक महामार्गाने वाळू वाहतूक होत असताना पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालून अवैध वाळू वाहतुकीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

..........................

पुढारीच वाळूतस्करांना पाठीशी घालतात ?

महसूल व पोलीस प्रशासनाने जर अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई केली तर तालुक्यातील व पठार भागातील काही पुढारी आपल्या पदाचा वापर करून ती सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाब आणत असल्याचे काही महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: Illegal sand extraction from radish river