दहा वर्षांच्या मुलीला गळफास देत पती-पत्नीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:15+5:302021-09-07T04:26:15+5:30

अहमदनगर : अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला प्रथम गळफास लावला. त्यानंतर पती-पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केली. नगर शहरातील केडगाव येथील ...

Husband and wife also committed suicide by strangling a 10-year-old girl | दहा वर्षांच्या मुलीला गळफास देत पती-पत्नीनेही केली आत्महत्या

दहा वर्षांच्या मुलीला गळफास देत पती-पत्नीनेही केली आत्महत्या

अहमदनगर : अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला प्रथम गळफास लावला. त्यानंतर पती-पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केली. नगर शहरातील केडगाव येथील अर्थव नगर येथे रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

संदीप दिनकर फाटक (वय ४०), किरण संदीप फाटक (वय ३२) व मैथिली संदीप फाटक (वय १०) अशी मयतांची नावे आहेत. सोमवारी सकाळी फाटक यांच्या घरी कामवाला मुलगा गेला होता. दरवाजा वाजविल्यानंतर काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता ही घटना समोर आली. याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयतांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून गळफासामुळेच तिघांचाही मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद असल्याचे निरीक्षक मानगावकर यांनी सांगितले. पोलिसांना मयतांजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून कर्जाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस गेले तेव्हा संदीप याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता तर किरण व मैथिली यांचे मृतदेह जमिनीवर होते. प्रथम मुलीला गळफास दिला. त्यानंतर किरण हिने गळफास घेतला. त्यानंतर दोघींचेही मृतदेह खाली काढून ठेवल्यानंतर संदीप याने गळफास घेतला, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप फाटक यांचा होलसेल किराणा मालाचा व्यवसाय होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या बँकांचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळूनच कुटुंबीयांसह त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

------------------------

मैथिली होती उत्कृष्ट बॅडमिंटन पटू

आई-वडिलांनी घेतलेल्या घातक निर्णयाचा बळी ठरलेली दहा वर्षांची मैथिली ही उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होती. तिने जिल्हा व राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत विशेष प्रावीण्य मिळविले होते. या घटनेत दहा वर्षांच्या मुलीचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

--------

फोटो -०६ संदीप फाटक, ०६ किरण फाटक, ०६ मैथिली फाटक

Web Title: Husband and wife also committed suicide by strangling a 10-year-old girl