राहुरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर येत नाहीत. मात्र, हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूरला गाडी चालवीत जातात. शो-बाजी करतात. शो-बाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदत करा, अशी टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
देवळाली-प्रवरा येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, संकेत बावनकुळे, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, शहाजी कदम, पक्षप्रतोद सचिन ढुस, नगरसेवक बाळासाहेब खुरूद, ज्ञानेश्वर वाणी, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, सागर खांदे, राजेंद्र ढुस, सुधीर टिक्कल, सोपानराव शेटे, सोपानराव भांड, भाऊसाहेब गडाख, दिगंबर पंडित, दिलीप मुसमाडे मच्छिंद्र कदम, भीमराज मुसमाडे, सचिन सरोदे आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमध्ये प्रत्येक बुथवर २५ युवा वारियर्स जोडण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या अभियानाद्वारे होणार आहे. राज्यात २५ लाख युवकांचा युवा वारियर्सचे संघटन तयार करण्यात येणार आहे. या युवकांचा राजकारणासाठी वापर करण्यात येणार नाही, तर त्यांना त्यांच्या कलागुणांनुसार आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सगळ्याच तरुणांना नोकऱ्या मिळवून देऊ शकत नाही; परंतु त्यांचे आवडीचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. राज्यातील सरकार फक्त मुंबईपुरते आहे. गेल्या १४ महिन्यांत मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री हिरोगिरी दाखविण्यासाठी गाडी चालवीत पंढरपूरला जातात. मात्र, लोकांच्या मदतीसाठी येत नाहीत. हे तीन चाकी सरकार लवकरच पंक्चर होणार आहे, असे माजी मंत्री बावनकुळे म्हणाले.
.........................
पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची निवड
भाजपचा देवळाली-प्रवरा शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित चव्हाण यांची, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्षपदी वसंतराव कदम, युवा मोर्चा देवळाली-प्रवरा शहराध्यक्षपदी डॉ. अजिंक्य कदम, युवा वारियर्स देवळाली-प्रवरा शहराध्यक्षपदी रविकिरण ढुस, राहुरी फॅक्टरी शाखा अध्यक्षपदी यश आदिक, तसेच तालुका प्रसिद्धी सल्लागारपदी चेतन कदम यांची निवड करण्यात आली.
260721\img-20210725-wa0180.jpg
शो-बाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांना मदत करा-माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे