शेवगाव (जि. अहमदनगर) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पाच एकर ऊस पेटून दिल्याची घटना सोनविहीर गावच्या (ता. शेवगाव) शिवारात घडली असून याप्रकरणी मंदा ज्ञानदेव विखे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्याअगोदर दोन गटाने निवडणुकीच्या वादातून परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर निघालेले सरपंचपदासाठीचे आरक्षण या वादाला कारणीभूत ठरले. मतमोजणीनंतर एका गटाला चार तर दुसऱ्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले. कमी जागा असलेल्या गटाकडे राखीव जागेचा उमेदवार आहे. त्यामुळे हा वाद उफाळून आला, असे एका नवनिर्वाचित सदस्याने सांगितले. या वादातून शेवगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हे दाखल झाले.
याबाबत पहिली फिर्याद नामदेव सखाराम विखे यांनी दिली. नामदेव विखे यांच्या मंडळाचे चार तर प्रतिस्पर्धी मंडळाचे तीन उमेदवार विजयी झाले. विखे यांच्या मंडळातील त्यांचे बंधू ज्ञानदेव सखाराम विखे यांच्याकडून विक्रम दगडू विखे हे पराभूत झाले. त्याचा राग येऊन गुरुवारी (दि.२८ ) विक्रम दगडू विखे, प्रमोद प्रल्हाद विखे, महेश दिलीप विखे, अण्णासाहेब श्रीकिसन विखे, बाप्पासाहेब अशोक विखे, संभाजी सुदाम तिडके आदींनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद दिलीप प्रल्हाद विखे यांनी दिली. ज्ञानदेव सखाराम विखे, नामदेव सखाराम विखे, शरद तुकाराम विखे, बाप्पासाहेब शरद विखे, रावसाहेब अंबादास विखे, मच्छिंद्र दगडू विखे, दिलीप हरिभाऊ विखे आदींनी जमावाने येऊन लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केल्याचे दिलीप विखे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
शनिवारी (दि. ३०) मंदा ज्ञानदेव विखे यांनीही एक फिर्याद दिली. ज्ञानदेव सखाराम विखे व दीर नामदेव सखाराम विखे यांच्या नावावर असलेल्या गट नंबर १४३ मधील पाच एकर क्षेत्रावर १३ महिन्यांपूर्वी ऊस लागवड केली होती. शुक्रवारी (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास तुळशीराम हरिभाऊ विखे यांनी मंदा विखे यांना फोन केला. सुदाम पांडुरंग तिडके, अमोल शिवाजी तिडके, हरिभाऊ कडूबा शिंदे यांनी टेंभा घेऊन ऊस पेटून दिला, असे सांगितले. त्यावेळी घराबाहेर येऊन पाहिले असता शेताच्या दिशेने मोठा जाळ असल्याचे दिसले, असे मंदा विखे यांनी फिर्यादी म्हटले आहे.