विजेचा धक्क्याने शेळीचा मृत्यू, मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:42+5:302021-09-25T04:20:42+5:30
केडगाव : विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी झाली तर शेळी ठार झाल्याची घटना जेऊर येथे गुरुवारी (दि.२३) घडली. यावेळी नागरिकांनी ...

विजेचा धक्क्याने शेळीचा मृत्यू, मुलगी जखमी
केडगाव : विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी झाली तर शेळी ठार झाल्याची घटना जेऊर येथे गुरुवारी (दि.२३) घडली. यावेळी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
जेऊर येथील लिगाडे वस्तीवर विद्युत वाहिनी तुटल्याने जमिनीवर पडली होती. तेथे शेळ्या चारणारी मुलगी चैत्राली भाऊसाहेब तोडमल (वय १२) हिला विजेचा धक्का बसला. त्यात मुलगी जखमी झाली. एक शेळी तारेला चिकटल्याने जागेवरच मरण पावली. मागील आठवड्यात चापेवाडी रस्त्यावर विजेच्या तारा पडल्याने विकास म्हस्के यांच्या गायीचा व कुत्र्याचा मृत्यू झाला होता.
विद्युत वाहिनीची तार जमिनीवर पडलेली असताना याची कल्पना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. तरीही दोन दिवस त्या तारा जमिनीवरच पडून होत्या. त्यामध्ये विद्युत पुरवठा चालू असल्याने आजची दुर्घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनटक्के, माजी उपसरपंच बंडू पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तलाठी सुदर्शन साळवे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
जखमी झालेल्या मुलीला व शेळी मरण पावल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळण्याची मागणी रविराज तोडमल, सोमनाथ तोडमल, अक्षय तोडमल, अनिल तोडमल, गणेश तोडमल, विलास जाधव, वैभव तोडमल, नंदू तोडमल यांनी केली आहे.