बियाणांसाठी सव्वापंधरा हजार अर्जातून साडेतीन हजार शेतकऱ्यांचे नशीब उजळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:45+5:302021-06-10T04:15:45+5:30
अहमदनगर : शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार असून यासाठी जिल्ह्यातील १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज ...

बियाणांसाठी सव्वापंधरा हजार अर्जातून साडेतीन हजार शेतकऱ्यांचे नशीब उजळले
अहमदनगर : शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार असून यासाठी जिल्ह्यातील १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केले होते. जिल्हा कृषी विभागाकडून नुकतीच या अर्जांची लॉटरी (सोडत) उघडण्यात आली. यामध्ये ३ हजार ४४६ शेतकरी पात्र ठरले असून ५ हजार ९२४ शेतकरी ‘वेटिंग’वर आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व शेतीबाबतच्या अवजारांची मागणी करण्यासाठी कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आले होते. चालू खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांवर अनुदान देण्याबाबत २४ मे पर्यंत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेला नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार ४४६ शेतकरी पात्र ठरले असून ५ हजार ९२४ शेतकरी ‘वेटिंग’वर आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी बियाणांचा यामध्ये समावेश आहे.
----
कृषी विभागाने अनुदानित बियाणांबाबत कोणतीही जनजागृती केलेली नाही. यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. नाईलाजास्तव महागडी बियाणे शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहेत.
-आप्पा जाधव,
शेतकरी श्रीगोंदा
----
महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी अर्ज करतात. त्यातून लॉटरी पद्धतीने मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतो. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. त्यांना मिळेल त्या भावाने बियाणे खरेदी करावे लागतात. त्यामुळे नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून बियाणे द्यायला हवे.
-संदीप शिंदे,
शेतकरी, श्रीगोंदा.
----
शासनाने ऑनलाइन नोंदणीसह शेतकऱ्यांना ऑफलाइनही बियाणे उपलब्ध करून द्यायला हवेत. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइनची सुविधा नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे काय हा प्रश्न आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र तसे प्रयत्न कृषी विभागाकडून होताना दिसत नाहीत.
-रोहिदास शिंदे,
नगर