कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:48+5:302020-12-25T04:16:48+5:30

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात ...

Farmers of Kopargaon taluka waiting for rotation! | कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात एक रबी व दोन उन्हाळ अशा तीन आवर्तनांच्या तारखा जाहीर झाल्या नाही. तसेच बैठकीनंतर दीड महिना उलटूनही आवर्तनांच्या तारखाच जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कोपरगावात ही बैठक घेऊन नेमका काय फायदा झाला ? असाच प्रश्न कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक ही कोपरगावात ७ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आली. या बैठकीत तारखा जाहीर न करता तीन आवर्तनांची घोषणाही करण्यात आली. या बैठकीपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने समितीच्या बैठकीसाठी नियोजित तीन आवर्तनांच्या संभाव्य तारखा गृहीत धरून टिपण्णी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये रबीचे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२१ असे ३२ दिवस, तसेच उन्हाळचे १ ते मार्च २५ मार्च - २५ दिवस व तिसरे १ ते २५ मे - २५ दिवस असे संभाव्य नियोजन केले होते; परंतु बैठकीत तसेच अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणीच नसल्याने आवर्तनाचे नियोजन करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यांचे म्हणणे सत्य असेल तर १० डिसेंबर २०२० अखेर डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर दोन्ही मिळून ३ हजार ५८० हेक्टर इतक्या हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार ही शेतकऱ्यांची मागणी नाही का ? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

...................

कोपरगावात झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीला साधारणतः दीड महिना उलटून देखील आवर्तनाच्या तारखांचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही. धरण पूर्ण भरलेले असताना जानेवारीत रबीचे १ आवर्तन देण्याचा नक्की अर्थ काय ? त्यामुळे येथून पुढे उन्हाळ आवर्तनाप्रमाणे रब्बीचे आर्वतनाचा देखील कालावधी पुढे ढकलण्याचा डाव दिसतो आहे. असे एक सामान्य शेतकरी म्हणून माझे मत आहे.

- तुषार विध्वंस, शेतकरी, कोपरगाव

Web Title: Farmers of Kopargaon taluka waiting for rotation!