मुळा कालव्याच्या आवर्तनासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:15+5:302021-08-19T04:25:15+5:30

तिसगाव : अठरा जुलैनंतर महिना सरला, नक्षत्रे कोरडीच जात आहेत. विहिरींनी तळ गाठला. फळबागा जगविण्यासाठी उत्पादक शेतकरी टँकरचे पाणी ...

Farmers aggressive for radish canal rotation | मुळा कालव्याच्या आवर्तनासाठी शेतकरी आक्रमक

मुळा कालव्याच्या आवर्तनासाठी शेतकरी आक्रमक

तिसगाव : अठरा जुलैनंतर महिना सरला, नक्षत्रे कोरडीच जात आहेत. विहिरींनी तळ गाठला. फळबागा जगविण्यासाठी उत्पादक शेतकरी टँकरचे पाणी घेऊ लागला आहे. ऋतुमान असूनही पाऊस रूसला. वृद्धेश्वर कारखाना (ता.पाथर्डी) परिसरातील विविध गावांतील ग्रामसभांमध्ये मुळा कालव्याच्या आवर्तनासाठी ठराव करण्यात आले. त्यामुळे मुळा पाटचारीच्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पालकमंत्र्यांच्या पाथर्डी दौऱ्यात आमदार मोनिका राजळे यांनी हीच लोकहिताची भावना मांडली. तेथेही योग्य निष्कर्ष न निघाल्याने आवर्तनप्रश्नी शेतकऱ्यांची भूमिका उग्र स्वरूप धारण करीत आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांची कासार पिंपळगाव येथे भेट घेऊन सुसरे, साकेगाव, पाडळी, चितळी, ढवळेवाडी, काळेगाव, हनुमान टाकळीसह कोपरे गावच्या शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. कोरोनाबाबतचे निर्बंध खुले झाल्याने या गावात स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभा आवर्तनाच्या विषयांनीच गाजल्या.

सरपंच पदाधिकाऱ्यांनी राजळे यांना शेतकऱ्यांचे वास्तव सांगितले. पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करा, असे साकडे घातले. राहुल राजळे यांनी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. शेतकऱ्यांच्या उद्रेकाबाबत अवगत केले.

आठ दिवसांत आवर्तनाचा निर्णय न झाल्यास पाडळी येथे राज्यमार्गावर मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा सरपंच बाबासाहेब चितळे, सुरेखा गर्जे, वैशाली कंठाळी, छाया सातपुते, दिलीप कचरे, वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ यांनी दिला आहे.

---

मुळा धरणात ६८ टक्के पाणीसाठा आहे. औद्योगिक व पिण्यासाठीचा वापर या दृष्टीने सदर पाणीसाठा राखीव आहे. आवर्तनाची मागणी होत आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन मागविले आहे.

-सायली पाटील,

कार्यकारी अभियंता, पाटबंधारे

----

खरिपासह ऊसपीक संकटात आहे. महिना उलटला, पाऊसच नाही. लोकभावना नजरेस ठेवून आवर्तनासाठी संघर्ष करणार आहे.

-राहुल राजळे,

जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Farmers aggressive for radish canal rotation