टपरी मार्केट नियमित करण्यासाठी मुदत वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:25+5:302021-07-24T04:14:25+5:30

अहमदनगर : पक्के बांधकाम केलेले गाळे भाड्याने घेणे परवडत नाही, म्हणून पत्र्याचे शेंड उभारून तिथे आताच व्यवसाय सुरू केले ...

Extend the deadline to regularize the tapari market | टपरी मार्केट नियमित करण्यासाठी मुदत वाढवून द्या

टपरी मार्केट नियमित करण्यासाठी मुदत वाढवून द्या

अहमदनगर : पक्के बांधकाम केलेले गाळे भाड्याने घेणे परवडत नाही, म्हणून पत्र्याचे शेंड उभारून तिथे आताच व्यवसाय सुरू केले आहेत. पत्र्याचे शेड पाडू नका, नियमित करण्यासाठी मुदत वाढवून द्या, अशी विनंती टपरी मार्केट धारकांनी महापालिकेकडे केली.

महापालिकेकडून शहर व परिसरातील विनापरवाना टपरी मार्केट पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत. शहरासह उपनगरांत विनापरवाना टपरी मार्केटचे सर्वेक्षण मध्यंतरी करण्यात आले होते. त्यानुसार नगर शहरासह उपनगरांमध्ये सुमारे १ हजार १९४ विनापरवाना टपरी मार्केट उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मनपाने ६११ टपरी मार्केट मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर टपरी मालकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत ११२ टपरी मालकांचे म्हणणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. यावेळी टपरी मार्केट नियमित करून घेण्यासाठी मालकांनी आणखी एका महिन्याची मुदत देण्याची मागणी केली. तसेच टपरी मार्केट पाडू नका, अशी विनवणी प्रशासनाकडे केली.

परंतु, महापालिका टपरी मार्केट पाडण्यावर ठाम आहे. टपरी मार्केटसाठी परवानगी घेतलेली नाही. रस्त्यात अतिक्रमणे करून टपरी मार्केट उभारण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. काही खासगी जागेत पत्र्याची शेड उभारली आहेत. परंतु, काहींचे भूखंड अंतिम करण्यात आलेले नाहीत. शेड मनपाच्या नियमानुसार उभारलेली नाहीत. त्यामुळे शेड काढून घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाणार असून, मुदत संपल्यानंतर थेट कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

शहरासह उपनगरांतील रस्त्यांच्या बाजूला दुकानांसमोर अनधिकृत पत्र्याची शेड उभारण्यात आली आहेत. काही संपूर्ण गाळे पत्र्याचे तयार केलेले आहेत. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. टपरी मार्केट अनधिकृत असून, टपरीमालकांनी स्वत:हून शेड काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई केली जाईल.

- के. वाय. बल्लाळ, प्रमुख अतिक्रमण विभाग. महापालिका

Web Title: Extend the deadline to regularize the tapari market