अहमदनगर : कोरोना लसीच्या एका डोससाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला होते. मात्र गेल्या महिनाभरापासून मुबलक लस उपलब्ध झाल्याने डोससाठी लाभार्थी शोधण्याची वेळ आली आहे. अनेक गावांत लसीकरणाची शिबिरे आयोजित केली जातात; परंतु लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद न मिळाल्याने निम्मेअधिक डोस शिल्लक राहतात. गावातील कार्यकर्त्यांना लाभार्थी आणण्यासाठी वाडीवस्तीवर फिरावे लागत आहे.
नगर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणास कमीच प्रतिसाद होता; परंतु मार्चनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली; परंतु त्या कालावधीत कमी लस उपलब्ध होत असल्याने केंद्रांवर लस घेण्यासाठी झुंबड उडत असे. अनेक केंद्रांवर त्यातून संसर्ग वाढण्याचेही प्रकार झाले. मध्यंतरीचे चार ते पाच महिने काहीशी अशीच स्थिती होती. शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. परंतु आता गेल्या महिनाभरापासून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सहा लाख डोस संपले आहेत. त्यामुळे आतापर्यंत लसीकरणाचे दोन्ही डोस मिळून २३ लाख ५० हजारांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाबरोबरच आता उपकेंद्र व गावोगावी लसीकरण शिबिरे घेण्यात येत आहेत. एकाच केंद्रावर किंवा गावात ५०० ते १००० पर्यंत लस दिली जात आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात काही प्रमाणात लस घेतली जाते. परंतु दुपारनंतर प्रतिसाद कमी होतो. शेवटी लस शिल्लक राहिल्याने गावातील कार्यकर्त्यांना लाभार्थी शोधावे लागतात. अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबतात. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी नियमित लसीकरण सांभाळून कोरोना लसीकरणाचे काम अहोरात्र करीत आहेत.
----------
लसीकरण आढावा
एकूण उद्दिष्ट - ३८ लाख ८७ हजार ९६०
पहिला डोस - १७ लाख ४२ हजार ३६९ (४५ टक्के)
दुसरा डोस - ६ लाख ८ हजार १४६ (१६ टक्के)
एकूण लसीकरण - २३ लाख ५० हजार ५१५
-------------------------