संगमनेर खुर्द शिवारात दरोडा

By Admin | Updated: August 5, 2014 23:58 IST2014-08-05T23:46:20+5:302014-08-05T23:58:39+5:30

चंदनापुरी : अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने संगमनेर खुर्द शिवारात घरावर दरोडा घालून मारहाण करीत सोन्याचे दागिने लांबविले.

Dacoity in Sangamner Khurd Shivar | संगमनेर खुर्द शिवारात दरोडा

संगमनेर खुर्द शिवारात दरोडा

चंदनापुरी : अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने संगमनेर खुर्द शिवारात घरावर दरोडा घालून मारहाण करीत सोन्याचे दागिने लांबविले. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात ९-१० दरोडेखोरांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील नाशिक-पुणे महामार्गालगत राहणाऱ्या वर्पे कुटुंबीयांना लक्ष्य केले. अंधाराचा फायदा घेत स्वयंपाकघरातील खिडकीच्या खालच्या विटा अलगदपणे काढून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील अण्णासाहेब वर्पे, लक्ष्मीबाई वर्पे, सोमनाथ वर्पे, सुरेखा वर्पे, ताई शिंदे, किसन शिंदे व विजय बालोडे यांना हातातील काठ्या व कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. घरातील सामानाची उचका-पाचक करून लक्ष्मीबाई वर्पे यांच्या गळ्यातील सुमारे ३२ हजार रूपये किमतीचे १ तोळे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने लांबविले. या प्रकरणी राजू अण्णासाहेब वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात ९-१० दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी करीत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक गांगुर्डे व पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Dacoity in Sangamner Khurd Shivar