संगमनेर : तालुक्यातील देशमुख मळा (धांदरफळ) शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली सुनील कडलग यांना जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. कडलग यांनी लोकसहभागातून शाळेचा सर्वांगीण विकास केला आहे.
देशमुख मळा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचादेखील या शाळेकडे ओढा वाढला आहे. कडलग यांच्या पुढाकारातून शाळा आय.एस.ओ. मानांकित झाली आहे. त्यांचे शाळेसाठी योगदान बघून ग्रामस्थांनी शाळेला आर्थिक मदत केली आहे. त्यातून कला मंच, प्रवेशद्वार, कंपाउंड, मुलांसाठी खेळणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रोटरी, इनरव्हिल क्लबसारख्या सामाजिक संस्थांची मदत मिळवून रोटरी ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम, रोटरी वाचनालय, रोटरी हॅण्ड वॉश स्टेशन हे प्रकल्प शाळेत राबविले. त्याशिवाय गांडूळखत प्रकल्प, औषधी वनस्पती, सोनू-मोनू बचत बँक प्रकल्प, शुद्धलेखन प्रकल्प, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, मात्र शिक्षण चालू’ यासाठी रोटरी क्लबच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना रोटरी डिजिटल स्कूल टॅब मिळवून दिले. ऑनलाइन शिक्षणासोबतच ऑफलाइन शिक्षणासाठी कडलग यांनी मुलांना त्यांच्या घरी जाऊन मदत केली.
जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील शाळांचे सर्वेक्षण करून २१ शाळांना इनरव्हिल क्लबच्या माध्यमातून ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम प्रकल्प, शैक्षणिक साहित्याची मदत, गरजेनुसार बांधकाम साहित्य, खेळाचे साहित्य अशी मदत मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. तत्कालीन इनरव्हील इंडियाच्या प्रेसिडेंट हिल्टन पेट्रेशिया यांनी कडलग या पूर्वी कार्यरत असलेल्या निमगाव भोजापूर शाळेस सदिच्छा भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला होता.
वृषाली कडलग येथील इनरव्हील क्लबच्या संचालिका असून, सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. जिजाऊ बिग्रेडच्या माध्यमातून त्यांनी वधू-वर मेळाव्यांच्या आयोजनात योगदान दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी कार्य, तसेच राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ या मासिकाच्या संपादक मंडळावर त्या कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व आर्थिक सल्लागार सुनील कडलग यांच्या त्या पत्नी असून, गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे.