कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:42+5:302021-09-07T04:26:42+5:30

पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या तसेच रखडलेल्या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर ...

Complete the work of Kalyan-Visakhapatnam National Highway | कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करा

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करा

पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या तसेच रखडलेल्या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

ऋषिकेश ढाकणे यांनी रविवारी नागपूर येथे जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. १३० कोटी रुपये खर्चून या महामार्गाचे काम होत आहे. पाच वर्षे झाली तरी आजतागायत हे काम पूर्ण झालेले नाही. पाच वर्षांपूर्वी मेहेकरी ते पाडळशिंगी दरम्यानचा सर्व रस्ता व पूल खोदून ठेवला. त्यानंतर नगर ते मेहेकरी व भुतेटाकळी ते पाडळशिंगी हा रस्ता पूर्ण झाला. मात्र मेहेकरी ते पिंपळगव्हाण रस्त्याच्या कामाला ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे जे ग्रहण लागले ते आजपर्यंत सुटलेले नाही. आतापर्यंत ३५० प्रवाशांचा विविध अपघातात मृत्यू झाला आहे. या कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आतापर्यंत तीन ठेकेदार कंपन्या बदलूनही या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या ज्या ठेकेदार कंपनीला हे काम देण्यात आलेले आहे. त्यांचेही काम संथगतीने चालू आहे. पुलाचे काम रखडल्यामुळे पावसाळ्यात वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, असे साकडे ढाकणे यांनी गडकरी यांना घातले आहे.

गडकरी यांनी दिल्लीला गेल्याबरोबर हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन ढाकणे यांना दिले.

----

बबनराव ढाकणेंच्या तब्येतीची विचारपूस..

मंत्री गडकरी व ढाकणे परिवाराचे जुने स्नेहबंध आहेत. गडकरी यांनी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या तब्येतीची चौकशी करून मला एकदा त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले. तसेच प्रतापराव यांचीही आस्थेने चौकशी केली. केदारेश्वर कारखान्याची धुरा तू यशस्वीपणे सांभाळतोय असेच काम करीत राहा, असा सल्ला गडकरी यांनी ऋषिकेश ढाकणे यांना दिला.

-----

०६ ढाकणे

ऋषिकेश ढाकणे यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Web Title: Complete the work of Kalyan-Visakhapatnam National Highway