महिला वकिलावर सहकाऱ्याचा अत्याचार

By Admin | Updated: March 1, 2016 23:33 IST2016-03-01T23:28:45+5:302016-03-01T23:33:57+5:30

अहमदनगर : एका वकिलाने महिला वकिलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Co-workers' atrocities on women advocates | महिला वकिलावर सहकाऱ्याचा अत्याचार

महिला वकिलावर सहकाऱ्याचा अत्याचार

अहमदनगर : एका वकिलाने महिला वकिलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून नंतर पत्नी म्हणून नांदविण्यास नकार देणाऱ्या वकिलाविरुद्ध वकील महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील एका वकिलाने एका वकील महिलेला पत्नी म्हणून नांदविण्यास तयारी दर्शविली होती. लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी जवळीक साधली आणि २०१४ पासून ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत अनेकवेळा विनयभंग आणि अत्याचार केला. २०१४ मध्ये वडगाव शेरी येथील हॉटेलमधील एका रुममध्ये, २०१५ च्या आॅक्टोबरमध्ये फिर्यादीच्या खासगी कार्यालयात पत्नीचा दर्जा देतो, असे सांगून समीर वखारे याने अत्याचार केला.
यावेळी समीरने आई-वडिलांनीही फिर्यादीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्याचे सांगितले. मात्र पत्नी म्हणून राहण्याचा प्रयत्न केला असता समीरने फिर्यादीस नकार देत दमदाटी, शिवीगाळ केली.
समीरच्या वडिलांनी कार्यालयात येवून विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी या २९ फेब्रुवारीला समीरच्या कार्यालयात गेल्या असता त्याने काहीही ऐकून घेतले नाही. उलट बायको असल्याचे सांगत समीरने विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कार्यालयातून तो पळून गेला.
या प्रकरणी महिलेने मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून समीर सुरेश वखारे, सुरेश तुकाराम वखारे, आशा सुरेश वखारे, रुपाली समीर वखारे (रा. जगदाळे निवास, वंजारगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील समीर सुरेश वखारे यास कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली आहे.
या प्रकरणाचा कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक गजानन करेवाड तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Co-workers' atrocities on women advocates