राशीन : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याला आलेली पिके विहिरीत पाणी असूनही केवळ वीज नसल्याने देता येत नाही. जनावरांनाही पाणी देता येईना. कोरोनामुळे ऑनलाइन असलेला अभ्यास वीज नसल्याने करता येईना. त्यातच ऑनलाइन स्कॉलरशिप परीक्षा चालू आहेत. मोबाइलच रिचार्ज होत नसल्याने परीक्षा कशा द्यायच्या. पिण्याच्या पाण्याचे हाल. रानच्या वस्तीचे हाल होत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा राशीन वीज उपकेंद्राचे सहायक अभियंत्याला चिलवडी (ता.कर्जत) ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी घेराव घातला.
चिलवडी गावाची वीज गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. राशीन वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता संदीप जाधव यांना चिलवडी ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. ते तेथून निघून गेले. दोन-अडीच तासानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क केला व मध्यस्ती केली. चिलवडी गावची वीज पूर्ववत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थ वीज उपकेंद्रातून बाहेर पडले.
सहायक अभियंता संदीप जाधव यांची राशीन येथून बदली करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांनी केली.
यावेळी डॉ. विनायक जगताप, विवेक सरकाळे, वैभव हिरभगत, उत्तम जगताप, राजेंद्र नवले, जयदीप शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.