मंडळाधिकारी, तलाठी कार्यालयाची संरक्षक भिंत चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:37+5:302021-09-07T04:26:37+5:30
कोपरगाव : कोपरगाव शहरातील तलाठी व मंडळाधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत चोरीला गेली असल्याची तक्रार कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ...

मंडळाधिकारी, तलाठी कार्यालयाची संरक्षक भिंत चोरीला
कोपरगाव : कोपरगाव शहरातील तलाठी व मंडळाधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत चोरीला गेली असल्याची तक्रार कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोमवारी (दि. ६) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे केली आहे.
संजय काळे म्हणाले, कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय या ठिकाणी संरक्षण भिंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आली. २०१९ मध्ये या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी सुमारे २ लाख ८४ हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणीची भिंत अस्तित्वात नाही. त्यामुळे ही भिंत चोरीस गेली की काय, याचा तपास व्हावा व संबंधित गुन्हेगाराला गजाआड टाकावे, अशी मागणी केली.
जर ही भिंत बांधलीच गेली नसेल तर दिवसाढवळ्या शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या संदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या संदर्भात चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
..................
असा कुठलाही प्रकार झालेला नाही. तक्रारदारांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा.
- प्रशांत वाकचौरे, सहायक अभियंता, बांधकाम उपविभाग, कोपरगाव
............