५३ गावे कोरोनामुक्त; नगर तालुक्याला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:34+5:302021-08-26T04:23:34+5:30

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, ११० गावांपैकी ५७ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ५३ ...

53 villages coronated; Relief to Nagar taluka | ५३ गावे कोरोनामुक्त; नगर तालुक्याला दिलासा

५३ गावे कोरोनामुक्त; नगर तालुक्याला दिलासा

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, ११० गावांपैकी ५७ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ५३ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. सद्य:स्थितीत १६० सक्रिय रुग्ण असून, आजतागायत ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील आठवड्यात सक्रिय रुग्णांचा आकडा दोनशेच्यावर होता. चालू महिन्यात एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत तालुक्यात १६ हजार ७३९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची लोकसंख्या एक लाख ३९ हजार ९४४ एवढी आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पहावयास मिळते. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, नियमांचे पालन होत असल्याने कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे.

आरोग्य केंद्रांतर्गत सक्रिय रुग्णसंख्या

मेहकरी- १८, देवगाव- ९, जेऊर- ३२, चास- २४, टाकळी काझी- २०, वाळकी- ११, देहरे-९, रुईछत्तीसी-१२, टाकळी खातगाव-२५.

----

आजपर्यंत बाधित, मृत्यूसंख्या

मेहकरी १३६६ (मृत्यू २६), देवगाव २०४३ (मृत्यू १४), जेऊर २६२३ (१०६), चास १९८६ (४४), टाकळी काझी २०५८ (९२) , वाळकी १५९६ (३२), देहरे १९९९ (३१), रुईछत्तीसी १११९ (२१), टाकळी खातगाव १९४९ (३६).

----

नगर तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत आहे. ही समाधानाची बाब असली तरी तिसरी लाट गृहीत धरून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक आंतर या कोरोनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करून प्रत्येकाने आपली व कुटुंबीयांची खबरदारी घ्यावी.

- योगेश कर्डिले,

वैद्यकीय अधिकारी जेऊर, प्राथमिक आरोग्य केंद्र

----

गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. मास्क, सॅनिटायझरचे वाटप तसेच गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. लोकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. लोकसहभागातून गाव कोरोनामुक्त झाले आहे.

-भीमराज मोकाटे,

सरपंच, इमामपूर

----

शाळांबाबत संभ्रमाची स्थिती

तालुक्यातील ५३ गावे कोरोनामुक्त झाली असली तरी तेथील शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. शासनाच्या नियमानुसार एक महिन्यापासून गावामध्ये कोरोना रुग्ण नसला पाहिजे. त्यावेळी शाळा सुरू करता येईल. अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी पालक संमती देत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 53 villages coronated; Relief to Nagar taluka