जम्बो भरतीची लेखी परीक्षा

By Admin | Updated: November 22, 2014 01:56 IST2014-11-22T01:56:58+5:302014-11-22T01:56:58+5:30

पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे.

Written examination of Jumbo recruitment | जम्बो भरतीची लेखी परीक्षा

जम्बो भरतीची लेखी परीक्षा

यवतमाळ : पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे. या भरती प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यातील चार पदाच्या ४७ जागेसाठी तब्बल १९ हजार ७८० उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. यासाठी ४७ परीक्षा केंद्र नियोजित केले आहेत.
जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी सांख्यिकी या दोन जागेसाठी एक हजार २७३ उमेदवार असून, पाच केंद्र आहेत. लघुलेखक या दोन जागेसाठी ५१ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. कनिष्ठ लेखाधिकारी या तीन जागेसाठी ३०३ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. तर परिचराच्या ४० जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार आहेत. त्यांची लेखी परीक्षा घेण्यासाठी एकुण ९२ परीक्षा केंद्र आहेत. यापैकी ४७ केंद्रापैकी बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा, राळेगाव येथे आहेत. दुपारी २ ते ३.३० यावेळेत परिचर पदाचा लेखी पेपर घेतला जाणार आहे. या जम्बो परीक्षेसाठी जिल्हा निवड समितीकडून तयारी करण्यात आली आहे. पंचायत समितीस्तरासाठी सात संपर्क अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे तर सात गट विकास अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय यवतमाळ मुख्यालयी होत असलेल्या लेखी पेपरसाठी १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभरतीच्या सुरूवातीलाच पेपर फुटल्याचा ठपका या भरती प्रक्रियेवर लागला होता. त्यानंतरही जिल्हा निवड समितीने नेटाने ही भरती प्रक्रिया कायम ठेवली. पेपरफुटीच्या सावटात असलेल्या या भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा निवड समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्याने आसनव्यवस्थेचेही नियोजन त्याच पद्धतीने केले जात आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Written examination of Jumbo recruitment